HKU1 Virus l कोलकातामध्ये HKU1 कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. हा कोरोना व्हायरसच्या प्रकारांपैकी एक असून तुलनेत सौम्य स्वरूपाचा आहे. कोविड-19 प्रमाणे तो घातक नाही, मात्र काही विशिष्ट गटातील लोकांसाठी अधिक धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे या विषाणूबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.
HKU1 व्हायरस म्हणजे काय? :
HKU1 हा मानवी कोरोना विषाणूचा एक प्रकार असून तो सर्वप्रथम 2005 मध्ये आढळून आला होता. तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू मानवामध्ये सौम्य स्वरूपाचा संसर्ग पसरवतो आणि बहुतांश लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी याचा संसर्ग होतो.
तज्ज्ञांच्या मते, “HKU1 हा नवीन विषाणू नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. हा बहुतेक वेळा सौम्य स्वरूपाचा असतो आणि गंभीर परिणाम निर्माण करत नाही.”
HKU1 Virus l HKU1 व्हायरसची लक्षणे कोणती? :
सतत खोकला
वाहणारे किंवा बंद नाक
घशात दुखणे किंवा खवखव
सायनस ब्लॉक होणे
डोकेदुखी
ताप
थकवा आणि अशक्तपणा
गंभीर प्रकरणांमध्ये, हा विषाणू न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या श्वसनासंबंधी आजारांना कारणीभूत ठरू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, हा संसर्ग बहुतेक लोकांमध्ये काही दिवसांत आपोआप बरा होतो. मात्र, पुढील गटातील लोकांनी विशेष काळजी घ्यावी –
– वृद्ध व्यक्ती
– लहान मुले
– मधुमेह, हृदयरोग, दम्यासारख्या दीर्घकालीन आजारांनी पीडित लोक
HKU1 व्हायरसचा प्रसार कसा होतो? :
– HKU1 हा इतर कोरोना विषाणूंसारखाच पसरतो. तो प्रामुख्याने संपर्काद्वारे संक्रमित होतो.
– खोकलताना किंवा शिंकताना हवेत विषाणूचे कण पसरतात.
– संक्रमित व्यक्तीच्या स्पर्शाने, विशेषतः दरवाजाची हँडल्स, टेबल्स, मोबाइल फोन यांसारख्या पृष्ठभागांना हात लावल्यानंतर चेहरा स्पर्श केल्यास संसर्ग होऊ शकतो.
HKU1 व्हायरसपासून संरक्षण कसे करावे? :
HKU1 हा कोविड-19 इतका घातक नसला तरी स्वच्छता राखणे आणि आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. संसर्ग टाळण्यासाठी पुढील उपाय करावेत.
नियमितपणे हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे
सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे
सामाजिक अंतर राखणे
सतत हात लावल्या जाणाऱ्या वस्तू स्वच्छ ठेवणे
HKU1 व्हायरस नवीन नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र, लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा राहतो आणि लवकर बरा होतो.






