हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार?, नवी तारीख आली समोर

On: January 23, 2025 3:23 PM
Hinjewadi Shivajinagar Metro
---Advertisement---

Hinjewadi Shivajinagar Metro l हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्वाच्या मेट्रो मार्गाचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने, ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येणार आहे. मार्च २०२५ पर्यंत मेट्रो धावण्याचे उद्दिष्ट असले तरी, ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. २३ किलोमीटरच्या या मार्गावर अद्याप काही स्थानकांचे काम अपूर्ण असल्याने ही मुदतवाढ मिळणार आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या या कामाला जुलै महिन्यात गती मिळाली होती. मात्र, ठेकेदार मुदतीत काम पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे.

कामाची सद्यस्थिती :

हिंजवडी (माण, मेगा पोलिस) ते शिवाजीनगर हा पुण्यातील तिसरा मोठा मेट्रो मार्ग आहे. संपूर्ण मार्ग १८ ते २० मीटर उंचावरून जात आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ८३१३ कोटी रुपये इतका आहे.

सद्यस्थितीत, या प्रकल्पाचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व पिलरचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. २३ स्थानकांपैकी १२ स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत.

मुदतवाढीचे कारण :

या कामाला नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली. मार्च २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या मार्गावरील काही स्थानकांचे काम अपूर्ण असल्याने, हे शक्य होणार नाही. त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ दिली जाणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासमोर (पीएमआरडीए) विषय मांडणार :

“मेट्रोचा हा मार्ग पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर ट्रायल रन आणि काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. मात्र, ही कामे सहा महिन्यांत पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण होणार नाही. प्राधिकरणासमोर हा विषय मांडणार आहे. त्यानंतर प्राधिकरण निर्णय घेईल,” असे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.

हिंजवडीतील वाहतूक कोंडी :

हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून उड्डाणपूल आणि इतर पर्यायांवर भर दिला जात असला तरी, नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. त्यातच, हिंजवडीसह बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीतही मोठी वाढ होत आहे. या मार्गावर सायंकाळी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी या वाहतूक कोंडीत अडकतात.

Hinjewadi Shivajinagar Metro l बाह्यवळण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदीचा विचार :

हिंजवडी नजीकच्या पुणे-मुंबई बाह्यवळण रस्त्यावर गर्दीच्या वेळी होणाऱ्या कोंडीचा फटका ‘आयटी नगरी’तील कर्मचाऱ्यांना बसत आहे. दररोज या परिसरातून १० हजार ट्रक जातात. बंगळुरू-मुंबई बाह्यवळण रस्त्यावर २९ किलोमीटर लांबीच्या सेवा रस्त्याचे काम प्रलंबित आहे. ही कामे लवकर झाल्यास वहनक्षमता १५ हजार वाहनांनी वाढणार आहे. महापालिकेने येथील भूसंपादन तातडीने करून ‘सर्व्हिस लेन’ सुरू कराव्यात, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत बाह्यवळण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा विचार महापालिका आणि पोलिस करत आहेत. गर्दीच्या वेळी या रस्त्यावर ३० ते ९० मिनिटांपर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याने हा पर्याय विचाराधीन असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

News Title : Hinjewadi-Shivajinagar Metro Work Delayed; Contractor to Get Extension

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now