Gold Silver Price Today | कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय कमोडिटी मार्केटमध्ये (MCX) सोने आणि चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा ऐतिहासिक झेप घेतली आहे. एकाच दिवसात चांदी तब्बल १२,००० रुपयांनी तर सोने ५,००० रुपयांहून अधिक महाग झाले आहे. आजचे लेटेस्ट दर जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरे जसे की मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील सराफा बाजारात या वाढीचे थेट पडसाद उमटले आहेत. ग्राहकांची आणि गुंतवणूकदारांची बाजारात मोठी लगबग पाहायला मिळत आहे.२ एप्रिल २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या सोन्याच्या वायद्यांमध्ये आज ₹५,३६५ (३.८६%) ची वाढ झाली आहे. काल ₹१.३७ लाखांवर असलेले सोने आज थेट ₹१,४४,२७७ प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. महाराष्ट्रातील किरकोळ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर स्थानिक कर आणि जीएसटीसह जवळपास ₹१,४८,५०० च्या घरात गेला आहे.
५ मे २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या भावात ₹१२,०८८ (५.४०%) ची विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे चांदी ₹२,३६,०२९ प्रति किलोवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील सराफा बाजारातही चांदीने अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
किमती इतक्या झपाट्याने का वाढल्या?
काल किमती अचानक पडल्यामुळे गुंतवणूकदारांनी कमी दरात सोने-चांदी खरेदी करण्याची संधी साधली, ज्यामुळे बाजारात मोठी मागणी निर्माण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असली तरी, प्रत्यक्षात जमिनीवरील तणाव कायम आहे. यामुळे अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे ‘सुरक्षित गुंतवणूक’ (Safe Haven) म्हणून वळत आहेत. काल ज्या व्यापाऱ्यांनी सोने-चांदी विकून नफा कमावला होता, त्यांनी आज वाढलेल्या किमतीत आपली पोझिशन पुन्हा कव्हर केल्याने बाजारात एकदम तेजी आली. येत्या काही दिवसांत बाजारात आणखी अस्थिरता राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.






