LPG Distribution Rules | मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि छोटे उद्योग यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत असून गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
यातच गॅस कंपन्यांनी वितरणाचे काही निकष बदलल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नव्या नियमांनुसार दोन गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना दोन सिलेंडरच्या बुकिंगमध्ये आता 35 दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे, तर एकच कनेक्शन असलेल्या ग्राहकांना 25 दिवसांनंतरच बुकिंग करता येणार आहे. या बदलामुळे राज्यातील अनेक भागात गॅस एजन्सीबाहेर मोठी गर्दी दिसून येत आहे.
रत्नागिरीत गॅस एजन्सीबाहेर पोलीस बंदोबस्त :
रत्नागिरी (Ratnagiri) येथे गॅस वितरणाच्या नव्या नियमांमुळे मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून गॅस एजन्सीबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सकाळपासूनच ग्राहकांची मोठी रांग लागली होती आणि अनेकांना उन्हात उभे राहून सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागली. (Gas Cylinder Shortage Maharashtra)
तसेच अमरावती (Amravati) शहरातील बाजार समिती परिसरात असलेल्या गॅस एजन्सीवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रशासनाकडून गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
LPG Distribution Rules | अकोला आणि शहापूरमध्ये पहाटेपासून रांगा :
अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट शहरात गॅस टंचाईची समस्या गंभीर होताना दिसत आहे. पहाटे पाच वाजल्यापासूनच नागरिक गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसून आले. अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. (LPG Distribution Rules)
त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील किनवली येथेही गॅससाठी मोठी गर्दी झाली. सकाळपासून ग्राहक एजन्सी कार्यालयाबाहेर रांगेत उभे राहिले होते. एकूणच गॅस वितरणाच्या बदललेल्या नियमांमुळे आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे राज्यभरात ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






