Gadchiroli School | गडचिरोली (Gadchiroli School ) जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील जयनगर जिल्हा परिषद शाळेत घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या अश्लील वर्तनामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले असून दोघांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
शाळेत शिक्षिकेशी अश्लील वर्तन, विद्यार्थ्यांना मारहाण
या घटनेत शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे यांच्यावर विद्यार्थ्यांसमोर अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. इतकंच नव्हे तर हे प्रकार पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दोघांनी मारहाण केल्याचंही समोर आलं आहे. या गंभीर प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी एकमताने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत संबंधित शिक्षक आणि शिक्षिकेला सेवेतून बडतर्फ केलं जात नाही, तोपर्यंत शाळा पुन्हा सुरू केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा पालकांनी घेतला आहे.
या वर्तनामुळे शाळेतील वातावरण बिघडले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम झाला आहे. गावकऱ्यांनी या अशोभनीय वर्तनाचा तीव्र निषेध करत शिक्षण खात्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासन आणि शिक्षण विभाग यावर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सोलापुरात मुलीवर शाळेच्या शिपायाचा लैंगिक छळ
दरम्यान, सोलापूर (Solapur) शहरातही एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेतील 55 वर्षीय शिपाई फ्रान्सिस आशिष पिंटो याच्यावर चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला आहे.
डिसेंबर 2024 पासून 24 मार्च 2025 पर्यंत त्याने पीडितेला बाथरूममध्ये नेत तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी पिंटोला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्रात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
Title : Gadchiroli School Principal and Teacher Obscene Act in Class






