नमाज सुरू असतानाच मशिदीत रक्ताचा सडा! भीषण स्फोटाने परिसर हादरला; ८ जणांचा मृत्यू

On: December 26, 2025 7:59 PM
Syria Mosque Blast
---Advertisement---

Syria Mosque Blast | सीरियामधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. होम्स शहरातील एका मशिदीत नमाज सुरू असतानाच भीषण स्फोट झाला. या स्फोटात किमान 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. (Friday Prayer Attack)

शुक्रवारी दुपारच्या नमाजावेळी इमाम अली बिन अबी तालिब मशिदीत मोठी गर्दी असताना हा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मशिदीत एकच गोंधळ उडाला. अनेक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले, तर काहीजण गंभीर अवस्थेत मदतीसाठी ओरडताना आढळले.

मशिदीत स्फोटक यंत्र लावल्याचा संशय :

या स्फोटाबाबत स्थानिक प्रशासनाने प्राथमिक माहिती दिली असून मशिदीत आधीच स्फोटक यंत्र ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. स्थानिक अधिकारी इस्साम नामेह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट अत्यंत शक्तिशाली होता, ज्यामुळे मशिदीच्या भिंतींना तडे गेले, खिडक्या फुटल्या आणि परिसरात रक्ताचे सडे पडले.

घटनेनंतर तात्काळ सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक टीम तपास करत आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Syria Mosque Blast | सरकारकडून तीव्र निषेध, दहशतवादी हल्ल्याचा संशय :

सीरियाच्या आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी नजीब अल-नासन यांनी या घटनेत 8 जणांचा मृत्यू आणि 21 जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, सरकारने याला दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. (Syria Mosque Blast)

सीरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध करत, हा हल्ला मानवी आणि नैतिक मूल्यांवर केलेला भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची सत्ता गेल्यानंतर देशात वाढलेल्या सांप्रदायिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला अत्यंत गंभीर मानला जात आहे. अलावाइट समुदायाला लक्ष्य करून अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे.

News Title: Friday Prayer Turns Tragic: 8 Killed in Deadly Mosque Blast in Syria’s Homs

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now