EPFO l कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (Employees’ Provident Fund Organisation – EPFO) सुमारे सात कोटी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या, शुक्रवारी, सदस्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ईपीएफओच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाची (Central Board of Trustees – CBT) बैठक होणार असून, त्यात आर्थिक वर्ष २०२५ साठी ईपीएफ (EPF) व्याजदरांचे मूल्यांकन केले जाईल.
व्याजदरात कपातीची शक्यता :
या बैठकीत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेअर बाजारातील घसरण, बॉण्ड यील्ड (Bond Yield) आणि जास्त क्लेम सेटलमेंट (Claim Settlement) लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाऊ शकतो. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने (Economic Times) याबाबत वृत्त दिले आहे. यापूर्वी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) गेल्या वर्षी व्याजदर ८.१५ टक्क्यांवरून ८.२५ टक्के केला होता.
बैठकीत मोठी घोषणा? :
गेल्या आठवड्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) गुंतवणूक व लेखा समितीने संस्थेच्या उत्पन्न आणि खर्चाचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर, समितीने ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. आता शुक्रवारी होणाऱ्या सीबीटीच्या (CBT) बैठकीत व्याजदरांवर विचार केला जाईल. जर सीबीटीने (CBT) देखील व्याजदरात कपात करण्याच्या शिफारशीला पाठिंबा दिला, तर कोट्यवधी ईपीएफ (EPF) सदस्यांना मोठा धक्का बसू शकतो.
ईपीएफओने (EPFO) २०२३-२४ मध्ये १,०७,००० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर सभासदांना ८.२५% व्याज दिले होते, तर त्याच्या आधीच्या वर्षी, म्हणजे २०२२-२३ मध्ये, सभासदांना ८.१५% व्याज देण्यात आले होते. १९८९-९० मध्ये सर्वाधिक व्याजदर देण्यात आले होते, जेव्हा ईपीएफने (EPF) १२ टक्के परतावा दिला होता.
राखीव निधीची योजना :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सभासदांना दरवर्षी एकसमान व्याजदर देण्यासाठी राखीव निधी तयार करण्याची योजना आखत आहे. यामागील उद्देश असा आहे की, शेअर बाजार आणि गुंतवणुकीतील साधनांमधील चढ-उतारांपासून सभासदांना मिळणाऱ्या व्याजदराचे संरक्षण व्हावे.






