EPF Interest Rate | देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर ८.२५ टक्के कायम ठेवण्यास मंजुरी दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतिम मान्यतेनंतर आता सात कोटींहून अधिक सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
८.२५ टक्के व्याजदराचा प्रस्ताव सादर :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation – EPFO) ने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदराचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने अंतिम मंजुरी दिली आहे. सरकारकडून ईपीएफ ठेवींना हमी दिली जात असल्यामुळे व्याजदर लागू करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयाची मान्यता आवश्यक असते.
यापूर्वी २ मार्च २०२६ रोजी केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (Central Board of Trustees – CBT) बैठकीत याच व्याजदराची शिफारस करण्यात आली होती. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सलग तिसऱ्या वर्षी ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता श्रम मंत्रालयाच्या निर्देशानंतर ईपीएफ खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही रक्कम जून महिन्याअखेरपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
EPF Interest Rate | गेल्या वर्षांतील व्याजदरांचा आढावा :
ईपीएफओने अलीकडेच नवीन डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने व्याजाची रक्कम पूर्वीपेक्षा अधिक वेगाने सदस्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे सात कोटींहून अधिक खातेधारकांना याचा लवकर लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीदेखील ईपीएफवरील व्याजदर ८.२५ टक्केच ठेवण्यात आला होता. त्याआधी २०२३-२४ मध्ये हा दर ८.१५ टक्क्यांवरून वाढवून ८.२५ टक्के करण्यात आला होता. मार्च २०२२ मध्ये आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी व्याजदर ८.१० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता, जो चार दशकांतील नीचांकी स्तर मानला गेला. यापूर्वी २०२०-२१ आणि २०१९-२० मध्ये व्याजदर ८.५० टक्के होता. तसेच २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के आणि २०१३-१४ तसेच २०१४-१५ या दोन्ही आर्थिक वर्षांत ८.७५ टक्के व्याज देण्यात आले होते. ८.२५ टक्के व्याजदर कायम राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती बचतीवर चांगला परतावा मिळणार असून, आता सर्वांचे लक्ष व्याजाची रक्कम खात्यात जमा होण्याच्या तारखेकडे लागले आहे.





