Bajaj Pulsar Launch | दुचाकीप्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बजाज ऑटो (Bajaj Auto) आपल्या लोकप्रिय पल्सर (Pulsar) मालिकेतील नवीन मॉडेल 12 ऑगस्ट रोजी सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकताच एक टीझर प्रसिद्ध केला असून त्यामध्ये नव्या बाईकची झलक दाखवण्यात आली आहे. आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि सुधारित परफॉर्मन्समुळे ही बाईक बाजारात चर्चेचा विषय ठरत आहे.
टीझरमधून नव्या डिझाइनची झलक :
‘Twist Into An All-New Rush’ या घोषवाक्यासह बजाज ऑटोने नवीन टीझर प्रदर्शित केला आहे. 12 ऑगस्ट रोजी पुणे (Pune) येथे आयोजित विशेष कार्यक्रमात कंपनी ही नवीन मोटरसायकल सादर करणार आहे. कंपनीने अद्याप मॉडेलचे अधिकृत नाव जाहीर केलेले नसले तरी टीझरमधील संकेतांवरून ही पल्सर मालिकेतील नवीन बाईक असल्याचे स्पष्ट होत आहे.
अलीकडे रस्त्यांवर चाचणीदरम्यान दिसलेल्या बाईक आणि टीझरमधील मॉडेलमध्ये अनेक साम्ये आढळून आली आहेत. दोन्ही मॉडेलमध्ये मोठा फ्रंट काऊल, अधिक दमदार इंधन टाकीचा भाग आणि नव्याने डिझाइन केलेले बॉडी पॅनेल्स दिसत आहेत. यामुळे बाईकला अधिक प्रीमियम आणि मजबूत लूक मिळणार आहे. याशिवाय लांब सीट, सरळ बसण्याची पोझिशन आणि एकूण बॉडीची रचना देखील अधिक आरामदायी असल्याचे संकेत मिळत आहेत.
Bajaj Pulsar Launch | आधुनिक फीचर्ससह परफॉर्मन्सवर भर :
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या पल्सरमध्ये पारंपरिक मस्क्युलर लूक कायम ठेवत आधुनिक स्टाइलिंग देण्यात येणार आहे. यामध्ये नवीन एलईडी (LED) हेडलाईट, शार्प टँक एक्सटेंशन, सुधारित बॉडी पॅनेल्स, अलॉय व्हील्स, फ्रंट डिस्क ब्रेक, रिअर मोनोशॉक सस्पेंशन आणि स्प्लिट-सीट सेटअप मिळण्याची शक्यता आहे. तसेच ब्लूटूथ (Bluetooth) कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल अलर्ट्ससारखी आधुनिक सुविधा देखील उपलब्ध होऊ शकते.
याशिवाय उत्तम राईड क्वालिटी, अधिक इंधन कार्यक्षमता आणि कमी आवाजासाठी कंपनी चेसिस आणि इंजिनमध्येही काही महत्त्वाच्या सुधारणा करू शकते. दरम्यान, मोठ्या कव्हरसह चाचणीदरम्यान दिसलेली बाईक नेमकी नवीन पल्सर 125 (Pulsar 125) आहे की अद्ययावत पल्सर 150 (Pulsar 150), याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, 12 ऑगस्ट रोजी यापैकी एका मॉडेलचे अनावरण होण्याची दाट शक्यता आहे.






