पिंपरी-चिंचवडकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! जाणून घ्या सरकारचा मास्टरप्लॅन

On: August 1, 2026 12:47 PM
Pimpri Chinchwad
---Advertisement---

Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. ई-आरटीएस E-RTS) या इलेक्ट्रिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

दीड वर्षांत प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन :

मुंबई येथे झालेल्या बैठकीत भविष्यातील वाहतूक नियोजन, एचसीएमटीआर (HCMTR) तसेच वर्तुळाकार मार्ग विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Dr. Vijay Suryawanshi) यांनी ई-आरटीएसची संकल्पना सादर केली. महामेट्रो (Maha Metro) यांच्या सहकार्याने हा प्रायोगिक प्रकल्प सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

ई-आरटीएस ही व्यवस्था मेट्रोप्रमाणे वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देणारी असेल. या प्रकल्पासाठी रबर टायरवर धावणाऱ्या पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात येणार असून प्रत्येक वाहनात 240 हून अधिक प्रवाशांची क्षमता असेल. त्यामुळे कमी वेळेत अधिक प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 17 किलोमीटरचा मार्ग विकसित केला जाणार असून तो राजा शिवछत्रपती चौक (गोडाऊन चौक), कुदळवाडी चौक, केएसबी चौक, ऑटो क्लस्टर, एम्पायर इस्टेट, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी चौक ते वाकड (Wakad) असा प्रस्तावित करण्यात आला आहे.

शहरभर विस्ताराची तयारी, प्रवास होणार अधिक सुलभ :

ई-आरटीएसचा हा मार्ग पुणे-नाशिक महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर महामार्ग तसेच शहरातील मेट्रो मार्गांशी प्रभावी जोडणी निर्माण करणार आहे. त्यामुळे विविध भागांदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होईल. प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर एचसीएमटीआर आणि शहरातील सर्व बीआरटी (BRT) मार्गांवर टप्प्याटप्प्याने ई-आरटीएसचा विस्तार करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. याशिवाय शहरातील सर्व मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी अखंड जोडणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, प्रदूषणात घट होईल आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार असून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेलाही चालना मिळेल.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब न करता नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आधुनिक आणि उच्च क्षमतेची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे हे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ई-आरटीएस आणि एचसीएमटीआरच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमध्ये स्मार्ट आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त केला.

News Title: E-RTS Project to Transform Pimpri Traffic

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now