Pahalgam Attack | काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने कारवाई करत पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासाठी श्रीनगरला पाठवण्यात आले आहे. (Pahalgam Attack)
एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल होणार
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी थेट संवाद साधण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे श्रीनगरला रवाना झाले आहेत. ते रात्री 10 ते 11 च्या दरम्यान सर्व अडकलेल्या पर्यटकांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या सुखरूप परतीसाठी आवश्यक उपाययोजना करणार आहेत.
राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व खर्च सरकारच्या तिजोरीतून केला जाणार आहे. या मोहिमेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची एक टीम आधीच काश्मीरमध्ये कार्यरत आहे. शिंदे यांनी सांगितले की, अडकलेल्या पर्यटकांच्या जेवणाची व निवासाची देखील काळजी घेण्यात येईल.
राज्य सरकारकडून मदतीसाठी हेल्पलाइन सक्रिय
महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने (Maharashtra State Disaster Management Cell) नागरिकांना मदतीसाठी 022-22027990 हा हेल्पलाइन नंबर दिला आहे. या नंबरवर नागरिक 24 तास संपर्क साधू शकतात. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे समन्वय राखण्याचे काम मंत्रालयातील विशेष पथक करत आहे.
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबईत पाठवण्यात आले असून, पुढे ॲम्बुलन्सद्वारे त्यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी लागणारी सर्व व्यवस्था महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येत आहे. (Pahalgam Attack)
मृतांची यादी आणि जखमींची नावे जाहीर
या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील खालील पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे:
- अतुल मोने – डोंबिवली
- संजय लेले – डोंबिवली
- हेमंत जोशी – डोंबिवली
- संतोष जगदाळे – पुणे
- कौस्तुभ गणबोटे – पुणे
- दिलीप देसले – पनवेल
जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- एस. बालचंद्रू
- सुबोध पाटील
- शोबीत पटेल
Title : Eknath Shinde in Kashmir after Pahalgam Attack






