Deenanath Hospital Death Case | पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिला ईश्वरी भिसे यांचा वेळेवर उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर चौकशी समितीने गंभीर ठपका ठेवला असून, या पार्श्वभूमीवर आता रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सुश्रुत घैसास (Dr. Sushrut Ghaisas) यांनी आपला राजीनामा दिला आहे.
डॉक्टर घैसास यांचा राजीनामा
प्रसंगाच्या दिवशी प्रसूतीसाठी ईश्वरी भिसे या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांकडे तातडीने दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांनी सुरुवातीला अडीच लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तरीही महिला रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. या विलंबामुळे त्यांच्या मृत्यूचे गंभीर आरोप रुग्णालयावर लावले जात आहेत.
या घटनेनंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला. रुग्णालयाच्या विरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली. याच प्रकरणात राज्य शासनाने नेमलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, त्यातही दीनानाथ रुग्णालयावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यानंतरच डॉ. घैसास यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर (Dr. Dhananjay Kelkar) यांच्याकडे सुपूर्द केला.
राजकीय दबावात कारवाईची मागणी
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “ईश्वरी भिसे यांचा मृत्यू नव्हे, ही सरळसरळ हत्या आहे.” त्यांनी स्पष्ट केले की केवळ डॉ. घैसास यांचा राजीनामा पुरेसा नाही, तर या प्रकरणातील सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.
त्याचबरोबर, अजून दोन समित्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. त्यानंतर अधिकृत स्वरूपात गुन्हे नोंदवले जाण्याची शक्यता आहे. सध्या समोर आलेल्या अहवालात रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाचा उल्लेख असून, त्या आधारे कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.
Title: Dr. Ghaisas Resigns in Deenanath Hospital Death Case






