CJP चे आंदोलन आणखी तापले! दिल्ली पोलिसांचा ताफा वाढला; अचानक नेमकं काय घडलं?

On: July 25, 2026 2:19 PM
Jantar Mantar
---Advertisement---

Jantar Mantar | दिल्ली येथील जंतर-मंतर (Jantar Mantar) परिसरात CJP चे आंदोलन सुरू असताना आंदोलकांची संख्या वाढत असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंग अधिक मजबूत केली असून अनेक ठिकाणी सुरक्षेचे अतिरिक्त थर उभारण्यात आले आहेत. संसदेच्या दिशेने जाणारे मार्गही पोलिसांनी अडवले आहेत.

बॅरिकेड्सला साखळ्या आणि लोखंडी पत्र्यांचा आधार :

जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे. आंदोलकांची संख्या वाढल्यामुळे पोलिस अधिक सावध झाले असून बॅरिकेड्स तोडून किंवा हटवून पुढे जाण्याचा कोणताही प्रयत्न रोखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावर मोठे खिळे आणि स्क्रू ठोकून लोखंडी पत्रे बसवण्यात आल्याचे दिसून आले आहे.

दिल्ली पोलिसांचे सहआयुक्त विजय सिंह (Vijay Singh) आणि त्यांच्या पथकाकडून संसदेच्या मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले तरी बॅरिकेडिंग नव्या पद्धतीने मजबूत केली जात आहे. जयसिंह मार्गासमोर जंतर-मंतर आहे, तर या दोन्ही भागांच्या मध्ये संसद भवनाचा परिसर येतो. त्यामुळे या मार्गांवर चारही बाजूंनी अडथळे उभारण्यात आले आहेत. एकापेक्षा अधिक स्तरांचे बॅरिकेड्स लावण्यात आले असून त्यानंतरही संसदेच्या मार्गाजवळ गर्दी वाढताना दिसत आहे.

Jantar Mantar | आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांची विशेष तयारी :

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर पोलिसांनी बॅरिकेडिंगचे तब्बल तीन वेगवेगळे थर उभारले आहेत. हे सर्व अडथळे लोखंडी साखळ्यांच्या मदतीने एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडल्यास आंदोलकांकडून बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न झाला तरी ते सहजपणे बाजूला करता येणार नाहीत. बॅरिकेड्सच्या तळाशी लोखंडी पत्रेही बसवण्यात आली आहेत.

रस्त्यावर उभारलेले बॅरिकेड्स जागेवरच घट्ट राहावेत यासाठी मोठे खिळे ठोकण्यात आले आहेत. आंदोलकांनी अडथळे हटवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखणे सोपे जावे, या उद्देशाने पोलिसांनी ही पूर्वतयारी केल्याचे सांगितले जात आहे. याआधीच दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम 163 लागू केले आहे. तसेच दिल्लीतील 18 मेट्रो स्थानके अद्याप बंद ठेवण्यात आली आहेत. फूड डिलिव्हरी आणि कॅब सेवांवरही निर्बंध घालण्यात आले असून हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना सायंकाळी 6.30 नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी लागू केलेल्या या निर्बंधांवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

News Title: CJP Protest Security Tightened

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now