Pahalgam Terror Attack l काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
ग्राउंड झिरोवर गृहमंत्र्यांचा आढावा, तिन्ही सैन्यदलांना अलर्टवर राहण्याचे आदेश :
गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी थेट ग्राउंड झिरोवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला, तर पंतप्रधान मोदी (Narendra modi) यांनी सौदी दौरा अर्धवट सोडून सकाळीच दिल्ली गाठली. दिल्ली विमानतळावरच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर संरक्षण मंत्रालयात तिन्ही सैन्यदलप्रमुख, एनएसए आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक पार पडली.
या बैठकीत सैन्य दलांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले. दहशतवाद्यांच्या कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले गेले असून, अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
Pahalgam Terror Attack l ‘आता हा हल्ला म्हणजे युद्धाचं स्वरूप घेतंय’ :
सुरक्षा यंत्रणांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांवर थेट हल्ला करणे ही युद्धासमान कृती असून, याला सैनिकी उत्तर देण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भारताच्या हद्दीतच नव्हे तर सीमेपलीकडे घुसून कारवाई करण्याचाही विचार सुरू आहे. (Pahalgam Terror Attack)
सध्या काश्मीरमध्ये सुमारे 120 दहशतवादी सक्रिय असून, त्यातील 110 पाकिस्तानी तर 10 स्थानिक दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. 2024 मध्ये भारतीय सैन्याने विविध ऑपरेशन्समध्ये 70 दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, गेल्या दोन वर्षांत एकूण 144 अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरू केली असून, दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.






