Crime News | प्रेमसंबंधासाठी आपल्या तिन्ही मुलांचा जीव घेतलेल्या एका आईचा अमानवी प्रकार उघडकीस आला आहे. १२, १० आणि ८ वर्षे वयाच्या तीन मुलांचा गळा दाबून खून केल्याची कबुली संबंधित महिलेने पोलिसांना दिली असून, तिच्यासोबत तिचा वर्गमित्र असलेल्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे.
मित्रामुळे पती आणि मुलांचा संपवला संसार-
रजिता नावाची ३० वर्षीय महिला आणि तिचा २०१३ साली विवाह झालेला पती चेन्नईया (Crime News) यांच्यात सुरुवातीपासूनच वयातील मोठ्या फरकामुळे तणाव होता. चेन्नईया टँकर चालक म्हणून काम करत होते. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने रजिता असमाधानी होती. काही महिन्यांपूर्वी ती एका शालेय गेट टुगेदरला गेली होती.
त्या वेळी तिला शाळेतील वर्गमित्र शिवकुमार भेटला आणि त्यांच्यातील जुने नाते पुन्हा जुळले. लवकरच दोघेही परस्पर प्रेमात गुंतले आणि एकत्र राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, शिवकुमारने रजिताला स्पष्ट सांगितले की, तिने मुलांना दूर केले नाही तर तो लग्न करणार नाही. यानंतर रजिताने आपल्या मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कट रचला.
रुग्णालयात गेल्यावर उघड झालं सत्य-
रजिताने एका मागोमाग एका तिन्ही मुलांचा टॉवेलने गळा दाबून खून केला. त्यावेळी चेन्नईया (Crime News) घरात नव्हते. रात्री उशिरा ते घरी परतल्यानंतर रजिताने अभिनय करत पोटदुखीची तक्रार केली आणि सांगितले की दहीभात खाल्ल्यामुळे तिची आणि मुलांची प्रकृती बिघडली आहे.
चेन्नईया आणि काही शेजाऱ्यांनी तिला आणि मुलांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांना परिस्थिती संशयास्पद वाटली. तपासणीदरम्यान हत्येचा संशय येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी रजिताची चौकशी केली असता तिने तिन्ही मुलांचा खून केल्याची कबुली दिली. तपास अधिक खोलवर गेल्यानंतर शिवकुमारचा या कटात सहभाग असल्याचे समोर आले आणि पोलिसांनी दोघांना अटक केली.






