पेट्रोल पंपावर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आत्ताच व्हा सावध, होऊ शकते फसवणूक

On: March 31, 2025 7:15 PM
Block Debit and Credit Card
---Advertisement---

Digital Transactions | डिजिटल व्यवहार वाढत असताना, ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकारही वाढत आहेत. अनेकदा आपण सोयीसाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरतो, पण ते किती सुरक्षित आहे याचा विचार करतो का?. विशेषतः पेट्रोल पंपांवर क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा एका व्हायरल व्हिडिओतून देण्यात आला आहे. सीए आणि फायनान्स इन्फ्लुएंसर सार्थक आहुजा (CA and Finance Influencer Sarthak Ahuja) यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) एका सामान्य पण मोठ्या फसवणुकीबद्दल माहिती दिली आहे, ज्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.

पेट्रोल पंपावरील फसवणूक

सार्थक आहुजा यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीसोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे, ज्यात कार्ड क्लोनिंगमुळे (Card Cloning) त्याला १ लाख रुपयांहून अधिकचा फटका बसला. ते सांगतात, “जर तुम्ही पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरत असाल, तर कृपया क्रेडिट कार्डने पैसे देणे टाळा.” त्यांनी दिलेल्या उदाहरणात, एका व्यक्तीने पेट्रोल भरल्यानंतर कार्ड स्वाइप केले, पण व्यवहार अयशस्वी (Transaction Declined) झाला. दुसऱ्यांदा प्रयत्न केल्यावरही तेच झाले. तिसऱ्या प्रयत्नात पेमेंट यशस्वी झाले.

मात्र, काही आठवड्यांनंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, त्याच्या कार्डमधून १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम परस्पर काढली गेली आहे. चौकशीअंती कळले की, पेट्रोल पंपावर अयशस्वी झालेल्या व्यवहारांदरम्यान त्याचे कार्ड स्किम (Card Skimmed) किंवा क्लोन (Duplicate) केले गेले होते. म्हणजेच, स्वाइप मशीनमध्ये छेडछाड करून किंवा त्यावर एखादे छोटे उपकरण बसवून कार्डची माहिती चोरण्यात आली होती, ज्याचा वापर करून बनावट कार्ड तयार केले गेले आणि फसवणूक करण्यात आली.

Digital Transactions | पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स वापरा

आपले कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सार्थक आहुजा काही महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स देतात. शक्य असल्यास पेट्रोल पंप, एटीएम (ATM) किंवा दुकानांमध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाइप करणे टाळावे, असा त्यांचा सल्ला आहे. विशेषतः जर स्वाइप मशीन (Swipe Machine) तुम्हाला काहीसे खराब झालेले किंवा त्याच्याशी काही छेडछाड (Tampered) केल्यासारखे वाटत असेल, तर अजिबात कार्ड स्वाइप करू नका.

कार्ड स्वाइप करण्याऐवजी, यूपीआय (UPI) किंवा ‘टॅप अँड पे’ (Tap and Pay) सारखे स्पर्शविरहित पेमेंट पर्याय (Touchless Payment Options) वापरावेत. यामुळे कार्ड क्लोनिंगचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. जर कधी तुमचे कार्ड पेमेंट अयशस्वी झाले, तर लगेचच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर (Registered Mobile Number) व्यवहार अयशस्वी झाल्याचा मेसेज आला आहे का, हे तपासा. जर असा मेसेज आला नसेल, तर फसवणूक होण्याची शक्यता असू शकते, अशावेळी तात्काळ बँकेशी संपर्क साधावा. अनेकदा क्लोन केलेल्या कार्डचा वापर परदेशात आंतरराष्ट्रीय व्यवहार (International Transactions) करण्यासाठी होतो. हे टाळण्यासाठी, जर तुम्ही परदेशात प्रवास करत नसाल, तर तुमच्या कार्डवरील आंतरराष्ट्रीय व्यवहारांची सुविधा बंद (Disable) करून ठेवावी, असा सल्लाही आहुजा देतात.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now