न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठा भ्रष्टाचार उघड, चक्क न्यायाधीशांच्या घरात आढळलं ‘नोटांचं भांडार’

On: March 21, 2025 12:57 PM
Corruption In Judiciary
---Advertisement---

Corruption In Judiciary | दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा (Yashwant Verma) यांच्या सरकारी बंगल्यात लागलेल्या आगीमुळे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. अग्निशमन दलाला आग विझवताना एका खोलीत सापडलेल्या बेहिशेबी रोकडीनं सर्वत्र खळबळ उडवली. (Corruption In Judiciary)

या प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या बदलीची शिफारस केली असून त्यांच्यावर चौकशी आणि महाभियोगाचीही शक्यता निर्माण झाली आहे.

आगीने उघड केलं ‘रोकडीचं’ रहस्य

न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्लीतील बंगल्यात आग लागली, त्यावेळी वर्मा हे शहरात उपस्थित नव्हते. कुटुंबीयांनी पोलिस आणि अग्निशमन विभागाला पाचारण केलं. आग विझवताना अग्निशमन दलाला बंगल्याच्या काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. ही माहिती रेकॉर्ड बुकमध्ये अधिकृतरीत्या नोंदवण्यात आली असून यामुळे न्यायमूर्तींविरोधात संशय अधिकच गडद झाला.

या घटनेनंतर सीजेआय संजीव खन्ना (CJI Sanjiv Khanna) यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तातडीची बैठक घेतली. बैठकीत निर्णय घेऊन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्याची शिफारस करण्यात आली. मात्र, काही सदस्यांनी फक्त बदली हा पर्याय अपुरा असल्याचं मत मांडत, राजीनामा किंवा महाभियोग प्रक्रियेची मागणी केली.

आतंर्गत चौकशीची शक्यता

काही मीडिया रिपोर्टनुसार, न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरोधात ‘इन-हाउस’ चौकशी प्रक्रियेचा विचार सुरू आहे. या प्रक्रियेनुसार, CJI संबंधित न्यायाधीशांकडून स्पष्टीकरण मागवतात. स्पष्टीकरण समाधानकारक नसेल, तर तीन वरिष्ठ न्यायाधीशांची चौकशी समिती स्थापन केली जाते. निकालानंतर राजीनामा किंवा संसदीय महाभियोग यापैकी निर्णय घेतला जातो.

दरम्यान, या घटनेवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी यावर टीका करत म्हटलं, “बदली ही शिक्षा आहे का? काय लाजिरवाणी गोष्ट आहे.” तर वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी, “न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार अत्यंत गंभीर बाब आहे. नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक होणं आवश्यक आहे.” असं मत व्यक्त केलं.

Title : Corruption In Judiciary Cash Found at Yashwant Verma Residence

 

Join WhatsApp Group

Join Now