Pune News | बावधन बुद्रुक परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळांमधून गाळयुक्त आणि पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारींनी जोर धरला आहे. या अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. (Pune Water News)
गाळयुक्त पाणी, नागरिक चिंतेत :
या भागातील नागरिक सांगतात की, नळातून येणारे पाणी पिण्यास तर दूर, पण वापरण्यासाठी सुद्धा हे पाणी योग्य नाही. नळातून दररोज पिवळसर, गाळयुक्त व दुर्गंधीयुक्त पाणी येते. त्यामुळे नागरिकांना पाणी उकळून किंवा फिल्टर करून वापरावे लागत आहे. “दररोज नळ उघडल्यावर पाण्याचा रंग पाहूनच दिवस खराब होतो” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
या दूषित पाण्यामुळे परिसरात आरोग्यविषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये पोटाचे विकार, अतिसार, टायफॉईड, अंगावर खाज सुटणे यांसारखे त्रास दिसून येत आहेत. स्थानिक डॉक्टरांच्या मते, हे आजार दूषित पाणी वापरामुळे होत आहेत. (Bawavdhan Water News)
परिसरातील अनेक नागरिकांनी आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार केली असली तरी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की, पाणीपुरवठा विभागातील निष्क्रियता आणि दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. “महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही दिवस पाणी तपासणी केली, परंतु त्यानंतर पुन्हा तीच स्थिती झाली,” असेही नागरिक सांगतात. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना दूषित पाण्यावरच जगावे लागत आहे, अशी टीका केली जात आहे.
Pune News | प्रशासन आश्वासन देतय, उपाय नाही :
या संपूर्ण परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “आपल्या आरोग्याशी तडजोड करून आम्ही जगत आहोत. तक्रारी केल्या तरी अधिकारी येऊन फक्त फोटो काढतात आणि जातात,” अशी नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेबद्दल परिसरातील महिला मंडळांनीही तीव्र रोष व्यक्त करत प्रशासनाकडे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. (Pune Water News)
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पाणीपुरवठा लाईनमध्ये गाळ साचल्याने तात्पुरती समस्या निर्माण झाली आहे. संबंधित भागात सफाई आणि तपासणीचे काम सुरू आहे.” मात्र, नागरिकांच्या मते, प्रशासनाकडून मिळणारी ही आश्वासने केवळ दिखाऊ असून परिस्थितीत कोणताही वास्तविक बदल झालेला नाही.
दूषित पाण्यामुळे वाढत चाललेल्या आरोग्यविषयक तक्रारी लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक ठरले आहे.






