Mumbai | गॅस सिलेंडरच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ झाल्याने मुंबई व एमएमआरमधील नागरिकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने ही दरवाढ जाहीर केली असून ती ९ एप्रिलपासून लागू झाली आहे.
मुंबई आणि एमएमआरमध्ये सीएनजी-पीएनजी दर वाढले
केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केल्यानंतर, आता महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) मुंबई महानगर प्रदेशात सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) प्रति किलो १.५ रुपये महाग झाला असून, नवा दर आता ७९.५० रुपये झाला आहे. तर, पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या पीएनजी गॅसच्या दरात १ रुपयाची वाढ होऊन तो ४९ रुपये झाला आहे.
एमएमआर परिसरातील (MMR) ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली यासह इतर भागांतील लाखो नागरिक या दरवाढीचा फटका सहन करणार आहेत. विशेषतः रिक्षा, टॅक्सी व इतर सार्वजनिक वाहने चालवणाऱ्यांसाठी ही दरवाढ अडचणीची ठरू शकते.
सीएनजी वाहनधारक आणि प्रवाशांना आर्थिक भार
मुंबई आणि एमएमआरमध्ये सुमारे ५ लाखांहून अधिक सीएनजीवर चालणाऱ्या खासगी गाड्या आहेत. त्याचप्रमाणे ३५८ सीएनजी पंप या भागात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यांमध्ये ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता इंधन दर वाढल्याने त्या वाढीचा परिणाम थेट सर्वसामान्य प्रवाशांवर होणार आहे.
एलपीजी सिलेंडरच्या किंमतीतही सामान्य ग्राहकांसाठी ५० रुपयांची वाढ झाली असून, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाही ही वाढ लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरसाठी आता ५५० रुपये मोजावे लागणार आहेत. सामान्य ग्राहकांना सिलेंडरसाठी ८५३ रुपये भरावे लागतील.
Title : CNG-PNG Prices Hiked from April 9 in Mumbai Region






