Raigad : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरून शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या महायुतीतील दोन प्रमुख घटकांमध्ये संघर्ष वाढत चालला आहे. शिवसेना आमदारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर गंभीर आरोप करत वादाला तोंड फोडले आहे. या वादामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला असून, रायगड (Raigad) जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेनेच्या आमदारांच्या दबावानंतर आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या Raigad जिल्हा पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली, मात्र त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. भरत गोगावले (Bharat Gogawale), महेंद्र दळवी (Mahendra Dalvi), आणि महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) या तिघा शिवसेना आमदारांनी सुनील तटकरे यांच्यावर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना हरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
शिवसेनेच्या आमदारांची आक्रमक भूमिका-
शिवसेना नेते आणि राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांच्यावर थेट आरोप करत विधानसभेत शिवसेनेच्या उमेदवारांना हरवण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केल्याचे म्हटले. “सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना निवडून आणण्यासाठी महेंद्र दळवी यांना पाडा असे आदेश दिले. आम्ही आमच्यावर केलेले आरोप चुकीचे ठरल्यास मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहोत,” असे आव्हान गोगावले यांनी दिले.
महेंद्र दळवी यांनीही राष्ट्रवादीवर टीका करत म्हटलं की, “लोकसभा निवडणुकीत आम्ही तटकरेंचे काम प्रामाणिकपणे केले, पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिनही उमेदवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तटकरे यांच्यासोबत आता कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.”
मुलीच्या पालकमंत्रिपदासाठी बाप मैदानात-
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आमदारांच्या आरोपांवर कडाडून प्रत्युत्तर दिले. सुनील तटकरे यांनी या आरोपांना निराधार म्हणत म्हटले की, “महायुतीमध्ये मतभेद असले तरी त्यावर चर्चा होऊ शकते. आयुष्यभर अशा संघर्षांचा सामना केला आहे, त्यामुळे शिवसेनेच्या टीकेचा काही परिणाम होणार नाही.”
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही शिवसेना आमदारांवर नाव न घेता खोचक टोला लगावत म्हटलं की, “पालकमंत्रीपदाबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. पदाची अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही, पण ती व्यक्त करताना संयम बाळगला पाहिजे.”
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील हा वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरला आहे. एकमेकांवर आरोप करताना नेत्यांची भाषा खालावत असल्याचे दिसत आहे. Raigad पालकमंत्रीपदाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर मोठी जबाबदारी आहे. रायगडमधील नागरिकांचे लक्ष आता या वादाच्या पुढील घडामोडींवर केंद्रित आहे.






