सिडकोच्या घरांना नापसंती; 26 हजार घरांसाठी अवघे 15 हजार जणांचं बुकिंग

On: January 29, 2025 4:31 PM
CIDCO
---Advertisement---

CIDCO l शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोने (CIDCO) नवी मुंबईत (Navi Mumbai) एकूण 67 हजार घरांची उभारणी आणि विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 26 हजार घरांच्या विक्रीसाठी ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजना (My Choice CIDCO Homes) आणली होती. या योजनेद्वारे अर्ज नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अर्ज नोंदणीसाठी चारवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता सिडकोच्या या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 30 जानेवारी 2025 सकाळी 11.00 वाजेपर्यंत आहे. म्हणजेच यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सिडकोने चार वेळा मुदतवाढ देऊनही बुकिंग शुल्क (Booking Amount) जमा करणाऱ्यांची संख्या मात्र अपेक्षित तेवढी झाली नसल्याचे चित्र आहे.

बुकिंग शुल्क भरणाऱ्यांची संख्या अल्पच :

सिडकोने चारवेळा मुदतवाढ दिल्यानंतरही बुकिंग शुल्क जमा करणाऱ्यांची संख्या मात्र समाधानकारक नसल्याचे दिसून येत आहे. सिडकोने नवी मुंबईतील खारघर (Kharghar), वाशी ट्रक टर्मिनल (Vashi Truck Terminal), खांदेश्वर (Khandeshwar), तळोजा (Taloja), पनवेल (Panvel), कळंबोली बस डेपो (Kalamboli Bus Depot), मानसरोवर रेल्वे स्टेशन (Mansarovar Railway Station), उलवे खारकोपर (Ulwe Kharkopar) या भागातील 26 हजार घरांच्या विक्रीसाठी ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजना आणली होती. चारवेळा अर्ज नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. 28 जानेवारीपर्यंत 1 लाख 60 हजारांपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी केवळ 15 हजार अर्जदारांनीच बुकिंग शुल्क सिडकोकडे जमा केल्याची माहिती आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि पुढील टप्पे :

सिडकोच्या नवी मुंबईतील घरांसाठी अर्ज करण्याची मुदत 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर 15 घरांसाठी प्राधान्यक्रम (Preference) नोंदवून बुकिंग शुल्क जमा करण्यासाठी 31 जानेवारी रात्री 11.30 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नोंदणी आणि बुकिंग शुल्क जमा करण्याची मुदत संपल्यानंतर सिडकोकडून 3 फेब्रुवारी 2025 ला अर्जदारांची मसुदा यादी (Draft List) संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. अर्जदारांची अंतिम यादी (Final List) सिडकोच्या वेबसाईटवर 10 फेब्रुवारी 2025 ला जाहीर केली जाईल. तर, घरांची सोडत (Draw) 15 फेब्रुवारीला होणार आहे.

सिडकोकडून घरांच्या किमतीचे समर्थन; अर्जदारांचा मात्र हिरमोड :

सिडकोने ‘माझे पसंतीचे घर’ योजनेसाठी सुरुवातीला अर्ज नोंदणी करण्यास सांगितले होते. मात्र, त्यावेळी घरांच्या किमती (Prices) निश्चित करण्यात आल्या नव्हत्या. केवळ 236 रुपये नोंदणी शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते. सिडकोने नंतर घरांच्या किमती जाहीर केल्या आणि अर्जदारांचा हिरमोड झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (Economically Weaker Section – EWS) अर्जदारांसाठी 25 लाख ते 48 लाख रुपयांपर्यंतचे घर खरेदी करावे लागू शकते. तर अल्प उत्पन्न गटातील (Lower Income Group – LIG) सर्वाधिक घराची किंमत 97 लाख रुपयांपर्यंत होती. परिणामी, अर्जदारांनी सिडकोच्या घरांच्या दरात कपात करण्याची मागणी केली. मात्र, सिडकोने घरांचे दर वाजवी असल्याचे सांगत किमती कमी करण्यास नकार दिला. परिणामी, अर्जदारांचा अपेक्षाभंग होऊन अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी झाली.

थोडक्यात, सिडकोच्या ‘माझे पसंतीचे घर’ योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. घरांच्या जास्त किमतींमुळे अनेक अर्जदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती अर्ज येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

News Title: CIDCO-My-Choice-Homes-Scheme-Poor-Response-Only-15000-Applicants-Paid-Booking-Amount-Last-Date-To-Apply-Today

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now