RBI l रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 10 वर्षांहून अधिक वयाच्या अल्पवयीन मुला-मुलींसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नव्या परिपत्रकानुसार, आता 10 वर्षांवरील मुले स्वतःचं बँक खातं उघडून ते स्वतःच्या नावाने आणि नियंत्रणात हाताळू शकतात. हा निर्णय आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
पालकांच्या माध्यमातून देखील खाते उघडता येणार :
RBI च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही वयाच्या मुलासाठी बचत खाते किंवा मुदत ठेव खाते नैसर्गिक पालकांच्या नावावरून उघडता येईल. विशेष म्हणजे आई हे ‘पालक’ म्हणून मान्य करण्यात आले आहे.
10 वर्षांचा वय पूर्ण झाल्यानंतर मुलं स्वतःच्या नावावर खाते उघडू शकतात आणि त्याचे व्यवहार देखील करु शकतात, मात्र काही मर्यादांमध्येच. उदा. नियत रक्कम, मर्यादित व्यवहार व जोखीम व्यवस्थापनाचे नियम लागू असतील.
18 वर्षांचं झाल्यानंतर खात्याचे पुनःप्रमाणन आवश्यक :
जेव्हा अल्पवयीन खातेदार 18 वर्षांचे होतील, तेव्हा बँकांनी त्यांच्या सहीचे नव्याने नोंद घेऊन खात्याचे अधिकृतपणे पुनःप्रमाणन करावं लागेल. बँकेला यासाठी ग्राहकाशी संपर्क साधावा लागणार आहे.
अल्पवयीन खातेदारांना ATM, डेबिट कार्ड, चेकबुक आणि इंटरनेट बँकिंगची सुविधा देताना बँकांनी जोखीम मूल्यांकनाचे धोरण पाळावे लागेल. खाते कोण हाताळतं – मुलं की पालक – याची माहिती बँकांना स्पष्ट ठेवावी लागेल.
तसेच या संपूर्ण प्रक्रियेत बँकांना KYC (Know Your Customer) चा नियम काटेकोरपणे पाळावा लागणार आहे. यामुळे खातेदाराची ओळख, वय, पालकत्व अशा सर्व गोष्टींची खातरजमा आवश्यक राहणार आहे.






