Blue Drum | मेरठ (Meerut) हत्याकांडानंतर निळ्या रंगाच्या ड्रमची चर्चा देशभरात सुरू झाली असून, याच पार्श्वभूमीवर आता ड्रम खरेदीसाठी ग्राहकांकडून ओळखपत्र मागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून, सुरक्षेच्या दृष्टीने ग्राहकांची माहिती संकलित केली जात आहे.
हत्याकांडामुळे ड्रमबाबत वाढलेली सतर्कता
सौरभ हत्याकांड प्रकरणात आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निळ्या रंगाचा ड्रम (Blue Drum) वापरल्याने या वस्तूची अचानक चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाचे विविध पैलू समोर येत असताना, अनेक पती आपल्या पत्नीच्या वर्तनामुळे असुरक्षित असल्याचं सांगणारे व्हिडिओ शेअर करत आहेत. यामध्ये मेरठमधील सौरभप्रमाणेच आपल्यावरही हल्ला होण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांनी निळ्या रंगाचा ड्रम विकताना ग्राहकांकडून आधार कार्ड मागण्यास सुरुवात केली आहे. ड्रम विकणाऱ्यांना भीती वाटते की, संशयित व्यक्तीने ड्रम खरेदी केल्यास पोलीस तपासात त्यांचीही चौकशी होऊ शकते. त्यामुळे काही विक्रेते ग्राहकांकडून आधार कार्ड तसेच पत्ता विचारत आहेत. काही डीलर्स तर रेकॉर्डही ठेवू लागले आहेत, जेणेकरून पोलिसांना माहिती द्यायला अडचण येणार नाही.
मेरठ हत्याकांडानंतर ड्रमची प्रतिमा बिघडली
ही घटना घडली मेरठमध्ये, जिथे मुस्कान रस्तोगीने आपल्या प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने पती सौरभची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करून नीळ्या रंगाच्या ड्रममध्ये टाकले गेले आणि ओल्या सिमेंटने पॅक करून लपविण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा तपास लवकरच उलगडला गेला आणि दोघांनाही अटक करण्यात आली.
या घटनेच्या परिणामस्वरूप ड्रम विक्रेते अधिक सतर्क झाले आहेत. सध्या ही उपाययोजना मेरठमध्ये अमलात आली असून, तिथे ड्रम खरेदीसाठी आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही सर्व दुकानदारांकडून अशी प्रक्रिया केली जात आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र काही व्यापारी आपल्या दुकानात सुरक्षेच्या दृष्टीने ग्राहकांची माहिती नोंदवत आहेत, जेणेकरून भविष्यातील कोणताही गैरप्रकार रोखता येईल.






