Blast in Lahore | पाकिस्तानातील लाहोर शहरात (Lahor) आज (८ मे) सकाळी सलग तीन शक्तिशाली स्फोट झाले आहेत. हे स्फोट लाहोरच्या वॉल्टन विमानतळाजवळ, गोपाल नगर आणि नसराबाद या भागात झाले. या घटनेने पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटांनंतर पाकिस्तानकडून युद्धजन्य हालचालींना वेग आला आहे. (Blast in Lahore)
काल रात्री १.०५ वाजता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Opration Sindhoore) अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांत लाहोरमध्ये हे स्फोट झाल्याने भारत-पाक तणाव आणखीनच तीव्र झाला आहे.
लाहोरमध्ये काय घडलं? :
पाकिस्तानच्या लाहोर शहरातील वॉल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद या ठिकाणी सलग तीन मोठे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोट अतिशय तीव्र आणि कानठळ्या बसवणारे होते. घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचावपथक दाखल झाले असून, स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (Blast in Lahore)
भारताच्या वतीने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ला करण्यात आला होता. हे हल्ले पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केले गेले. या कारवाईत केवळ २३ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.
Blast in Lahore | पाकिस्तानकडून युद्धसज्ज हालचाली :
या स्फोटांनंतर पाकिस्तानने ताबारेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धसज्ज हालचाली सुरू केल्या आहेत. रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहने तैनात करण्यात आली असून, लाहोरकडे जाणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत. सीमावर्ती गावंही रिकामी केली जात आहेत. ‘नोटीस टू एअर मिशन’ (NOTAM) जारी केल्याने लाहोर हवाई वाहतूक ठप्प झाली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे – पाकिस्तानच्या मुरीदके शहरात लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याची अंत्ययात्रा पोलीस आणि लष्कराच्या संरक्षणाखाली काढण्यात आली. या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांमध्ये दहशतवादी हाफिज अब्दुल रौफदेखील होता. पाकिस्तान लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याला साथ दिली, ही बाब जागतिक समुदायाचं लक्ष वेधणारी ठरली आहे.






