Vice President Election | देशाच्या राजकीय वर्तुळात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdip Dhankhad) यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं असून, 9 सप्टेंबर 2025 रोजी या पदासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, एनडीएकडून यावेळी एक धक्कादायक रणनीती राबवली जात असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भाजपकडून यंदा पारंपरिक नावांपासून दूर जात अनपेक्षित व्यक्तीस उमेदवार म्हणून पुढे आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एनडीएच्या बैठकीत रणनीती ठरली, नड्डा यांच्यावर मोठी जबाबदारी :
एनडीएच्या आज पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा झाली. यावेळी भाजपकडून निवडणूक व्यवस्थापन आणि उमेदवार निवडीसाठी जेपी नड्डा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. (Vice President Election)
यामुळेच सध्या चर्चा नसलेलं, पण भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरू शकणारं नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या रणनीतीचा उद्देश म्हणजे विरोधकांना गृहित धरता येणार नाही असा उमेदवार मैदानात उतरवणं. एनडीएकडे यावेळी पूर्ण बहुमत नसल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.
Vice President Election | इंडिया आघाडीकडूनही सशक्त उमेदवाराची तयारी :
दुसरीकडे, विरोधी पक्षांची इंडिया आघाडीदेखील या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मागील निवडणुकीत एनडीएकडे स्पष्ट बहुमत होते, पण या वेळी स्थिती वेगळी आहे. त्यामुळे विरोधक जर सर्वसमावेशक आणि स्वीकारार्ह चेहरा निवडून पुढे आणतील, तर एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. (Vice President Election)
एनडीए आणि इंडिया या दोन्ही गटांमध्ये तीव्र रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांचे नावं चर्चेतही नव्हते, असे व्यक्ती पुढे आल्यास ही निवडणूक आणखीनच रंजक ठरू शकते. परिणामी, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता, एक मोठी राजकीय लढत ठरणार आहे.






