Bihar Election Result 2025 | बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणीला आज अधिकृतपणे सुरुवात झाली असून राज्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. 243 जागांसाठीची मतमोजणी सुरु होताच पोस्टल मतांच्या पहिल्या कलांनी दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील संघर्ष चुरशीचा असेल, याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एनडीए (NDA) आणि महागठबंधन हे दोन्ही पक्ष सत्ता मिळवण्यासाठी उत्सुक आहेत, तर राजकीय विश्लेषकांच्या भाकितांमुळेही उत्सुकता आणखी वाढली आहे. (Bihar Election Result 2025)
सकाळी 8.45 पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण 119 जागांचा पहिला कल समोर आला आहे. यामध्ये एनडीए 75 जागांवर आघाडीवर असून महागठबंधन 38 जागांवर आघाडीवर दिसत आहे. याशिवाय जनसुराज 3 आणि इतर उमेदवार 3 जागांवर पुढे आहेत. सुरुवातीचा हा कल असला तरी दिवसभरातील पुढील मतमोजणी निर्णायक ठरणार आहे.
बहुमताचा जादूई आकडा आणि मतदानाची स्थिती :
बिहारमध्ये (Bihar Election) सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 122 वर आहे. राज्यात एकूण 243 विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर रोजी पार पडला होता, ज्यामध्ये 18 जिल्ह्यांमधील 121 जागांचा समावेश होता. या टप्प्यात 65.08 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर रोजी झाला आणि 20 जिल्ह्यांतील 122 जागांवर 68.42 टक्के मतदान झाले. (Bihar Election Result 2025)
या दोन्ही टप्प्यांतील मतदानाचा कल पाहता जनता मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडली असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे निकाल अधिक रोचक ठरण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामीण भाग तसेच शहरी विभागांमध्ये मतदारांची उत्स्फूर्तता विशेष जाणवत होती.
Bihar Election Result 2025 | एक्झिट पोलचे भाकीत आणि राजकीय समीकरणे :
एक्झिट पोलनुसार, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अंदाजानुसार एनडीएला 145 ते 163 जागा मिळू शकतात, तर महागठबंधनला 76 ते 95 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे निकाल खरोखरच एक्झिट पोलच्या जवळ जातो का, हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
एनडीएचे प्रमुख चेहरे नरेंद्र मोदी (Narendra Modi), नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासह महागठबंधनचे तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव (Lalu prasad yadav) या सर्वांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. दोन्ही पक्षांनी राज्यातील रोजगार, पायाभूत सुविधा, शिक्षण, सामाजिक न्याय अशा विषयांवर प्रचार केंद्रित केला होता. त्यामुळे कोणत्या मुद्द्यांना मतदारांची पसंती मिळाली याचा अंदाज निकालातून येईल.






