बिहारच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे शिवदीप लांडे विजयी होणार का? वाचा सविस्तर बातमी

On: November 14, 2025 10:29 AM
IPS Shivdeep Lande
---Advertisement---

IPS Shivdeep Lande | बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा निकाल जाहीर होत असताना सर्वाधिक चर्चा जर कोणाची होत असेल, तर ती आहे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि बिहारचा ‘सिंघम’ म्हणून ओळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande). धडाकेबाज कारवाई, गुन्हेगारीवर कडक भूमिका आणि जनतेत प्रचंड लोकप्रियता या गुणांमुळे लांडे यांनी बिहारमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ते राजकारणात उतरल्यापासून त्यांची निवडणूक अत्यंत चर्चेत आहे. (Bihar Election Result 2025)

सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून जमालपूर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या स्थितीबाबत महाराष्ट्रासह बिहारमधील मतदारांत उत्सुकता वाढली आहे. लांडे यांनी यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली असून सुरुवातीच्या कलांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जमालपूरमधून अपक्ष उमेदवार म्हणून लढतायेत लांडे :

शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) हे बिहारमधील जमालपूर (Jamalpur) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात त्यांना इंडियन इनक्लूझिव्ह पार्टीचे नरेंद्र कुमार तांती आणि जदयूचे नचिकेता मंडल यांचे आव्हान आहे. निवडणुकीपूर्वी लांडे यांनी ‘हिंद सेना’ या पक्षाची स्थापना केली असली तरी त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेची खरी परीक्षा यंदाच्या निवडणुकीत लागणार आहे.

बिहारमधील मतदारांमध्ये त्यांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर असल्याने मतमोजणीदरम्यान त्यांची कामगिरी काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः मुंगेर परिसरात त्यांना अफाट लोकप्रियता असून मोठा तरुण वर्ग त्यांच्यासोबत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

IPS Shivdeep Lande | IPS कारकिर्द, लोकप्रियता आणि राजकारणात उतरण्याचा निर्णय :

2006 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) यांनी जवळपास 18 वर्षे बिहार पोलिस दलात सेवा बजावली. कठोर आणि पारदर्शक कारवाईमुळे त्यांना ‘बिहारचा सिंघम’ ही उपाधी मिळाली. मुंगेरमध्ये 2009 ते 2011 दरम्यान ते एएसपी म्हणून कार्यरत असताना त्यांनी गुन्हेगारीवर कडक मोहीम राबवली आणि तीन वर्षांत गुन्हेगारीत मोठी घट घडवली. यामुळे त्यांच्या बाजूने एक प्रचंड जनसमर्थन उभं राहिलं.

बिहारव्यतिरिक्त मुंबईतील अमली पदार्थ विरोधी पथकात (ANC) त्यांनी केलेली कारवाई देखील लक्षवेधी ठरली. ड्रग्ज माफियांच्या टोळ्यांवर त्यांनी कडक कारवाई करत अनेक प्रकरणांवर पडदा फाडला होता. मनसुख हिरण हत्याकांडातील तपासातही त्यांची भूमिका महत्वाची होती. या सर्व कारवायांमुळे त्यांची प्रतिमा जनतेमध्ये आणखी मजबूत झाली.

लांडेंची संपत्ती, गुंतवणूक आणि निवडणुकीतील सफर :

निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, शिवदीप लांडे (IPS Shivdeep Lande) यांच्या बँक खात्यात 20.33 लाख रुपये जमा आहेत, तर विविध ठिकाणी केलेल्या गुंतवणुकींची किंमत 6.65 कोटी रुपये आहे. त्यांच्या नावावर अडीच कोटींचे गृहकर्ज आहे आणि 20 लाखांची कार त्यांच्याकडे आहे. त्यांच्या पत्नी व्यावसायिक असून त्यांच्या नावावर 100 ग्रॅम सोने असल्याचेही शपथपत्रात नमूद केले गेले आहे. (Bihar Election Result 2025)

लांडे यांनी “बिहार हीच माझी कर्मभूमी” असे जाहीर वक्तव्य करत लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता. त्यामुळे त्यांची राजकीय एन्ट्री बिहारमध्ये प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे. आता जमालपूर मतदारसंघात ते काय कामगिरी करतात आणि जनता त्यांना निवडून देते का, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

News Title: Bihar Election Result 2025: IPS Shivdeep Lande Contests from Jamalpur — Will the ‘Singham of Bihar’ Win?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now