बीड पुन्हा हादरलं! बेपत्ता असलेल्या एसटी वाहकाचा सापडला मृतदेह

On: January 28, 2025 3:26 PM
Kolhapur Crime
---Advertisement---

Beed News | राज्य परिवहन महामंडळाच्या (ST Mahamandal) माजलगाव आगारात (Majalgaon Depot) वाहक म्हणून कार्यरत असलेल्या दत्ता अंबलकर (Datta Ambalkar) यांनी २६ जानेवारीच्या मध्यरात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशामुळे निलंबनाची कारवाई झाल्याने अंबलकर तणावाखाली होते, अशी माहिती समोर आली आहे.

चिंचाळा (Chinchala) येथील रहिवासी असलेले दत्ता अंबलकर हे मागील दहा वर्षांपासून माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. गेल्या महिन्यात एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे ते तणावात होते. त्यानंतर १२ जानेवारीपासून ते कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते.

बेपत्ता झाल्यानंतर शोध सुरू

अंबलकर बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात (Majalgaon Police Station) मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर २६ जानेवारीच्या मध्यरात्री अंबलकर यांनी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्यांचे वडील शेतात गेल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

अंबलकर यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी (Wadwani Police) घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कुप्पा (Kuppa) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला.

Beed News | नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

शवविच्छेदन झाल्यानंतर काही काळ अंबलकर यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे आरोग्य केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर माजलगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख कोळपकर (Kolpakar) आणि इतर कर्मचाऱ्यांनी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांनी अंबलकर यांच्या नातेवाईकांची समजूत काढली.

कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चिंचाळा येथे अंबलकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now