Beed Cyber Crime| बीड (Beed) सायबर पोलिस ठाण्यातील एका गंभीर प्रकाराने राज्यभरात खळबळ उडवली आहे. पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या डीलसाठी आरोपीला परवानगीशिवाय गुजरातमध्ये नेल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांचे निलंबन झाले होते. आता या प्रकरणात सहभागी असलेले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तिघेही सरकारी वाहनाऐवजी खासगी गाडीत आरोपीसह गुजरातमध्ये गेले होते आणि तिथे एका व्यक्तीकडून पैशांची मागणी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत (Navneet Kanwat) यांनी केली असून, या संपूर्ण प्रकारामुळे सायबर पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीत गंभीर त्रुटी असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. हवालदार आणि चालकावर कारवाईसाठी केजचे सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मिना यांनी तपास अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारे गिरी आणि भाग्यवंत यांनाही बुधवारी निलंबित करण्यात आले आहे.
ठाणेदारही अडचणीत; कारवाईचे संकेत
सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास गात (Devidas Ghat) यांचीही चौकशी झाली असून त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक काँवत यांनी त्यांच्या विरोधात कसुरी अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षकांना पाठवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गात यांना नियंत्रण कक्षात पाठवण्याचा विचार सुरू आहे, मात्र याबाबत अंतिम आदेश अद्याप निघालेले नाहीत. काँवत यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते की, पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर आरोप सिद्ध झाल्यास ठाणेदारालाही जबाबदार धरले जाईल.
दरम्यान, निलंबनानंतर रणजीत कासले यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत विविध आरोप केल्याने बीड पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा मलीन झाली आहे. या प्रकरणाचा फटका सायबर पोलिस ठाण्याच्या एकंदर विश्वासार्हतेवर बसत आहे. कारवाईची प्रक्रिया सुरू असून, दोषींवर कठोर निर्णय घेतले जातील, असे काँवत यांनी स्पष्ट केले आहे. चांगले काम करणाऱ्यांना मात्र त्यांनी पाठबळ देण्याचे आश्वासनही दिले आहे.
Title: Beed Cyber Crime Police Face Suspension in Gujarat Deal






