Pahalgam Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देशातील मुस्लिम समाजाला शांततेचा आणि विरोधाचा संदेश देत मोठं आवाहन केलं आहे. यावेळी ते अत्यंत भावनिक दिसून आले. (Pahalgam Attack)
ओवैसींचं भावनिक आवाहन
खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी आपल्या व्हिडिओ संदेशामध्ये देशभरातील मुस्लीम बांधवांना आवाहन केलं की, शुक्रवारच्या नमाज पठणाच्या वेळी प्रत्येकाने आपल्या दंडाला काळी पट्टी बांधावी. हे शांततेचं प्रतीक ठरेल आणि आपण या दहशतवादी कृत्याचा ठामपणे निषेध करत असल्याचा संदेश देशभरात जाईल. ओवैसी म्हणाले, “आम्ही इस्लामच्या नावावर हिंसेला आणि खुनाला कधीही मान्यता देणार नाही.”
तसंच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, इस्लाममध्ये निरपराधांच्या हत्येला कुठलीही जागा नाही आणि अशा क्रूर कृत्यांचा निषेध मुस्लिम समाजाने उघडपणे करायला हवा.
एमआयएमचा निषेध, पाकिस्तानचा झेंडा फाडला
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये एमआयएमच्या (AIMIM) कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात एकत्र येऊन पाकिस्तानच्या दहशतवादी भूमिकेचा निषेध केला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा फाडण्यात आला आणि “पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देखील आल्या. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी भारत सरकारने पाकिस्तानला आता जशास तसं उत्तर द्यावं, अशी ठाम मागणी केली.
दरम्यान, ओवैसींच्या या आवाहनामुळे मुस्लिम समाजामध्ये एक वेगळी जागरूकता निर्माण झाली आहे. शांततेच्या मार्गाने दहशतवादाचा निषेध करत समाजाने ठोस भूमिका घेतली आहे. मुस्लिम समाजाकडून असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, दहशतवाद्यांच्या कृत्याला इस्लामशी जोडण्याचा कुठलाही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.
Title : Asaduddin Owaisi on Pahalgam Attack and Urges Muslims to Protest






