8th Pay Commission | केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबतची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोशल मीडियावर विविध दावे केले जात असल्याने कर्मचारी गोंधळलेले आहेत. अनेकांना बेसिक पगारात DA मर्ज होणार का, पगार किती वाढणार, सरकारची योजना काय आहे याबद्दलचे प्रश्न पडले आहेत. या सर्व गोंधळावर आता अर्थ मंत्रालयाकडून महत्त्वाची स्पष्टता आली आहे. (8th Pay Commission)
1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की डीए मूळ पगारात विलीन करण्याची सध्या कोणतीही योजना नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरत असलेले दावे निराधार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत अधिसूचना जारी केली असून आयोगाचे काम अधिकृतपणे सुरू झाले आहे.
किती वाढू शकतो पगार? कर्मचाऱ्यांसाठी काय फायदेशीर? :
अहवालांनुसार, 8th Pay Commission लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात (बेसिक + डीए) सुमारे 14% ते 54% वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र 54% वाढ अवास्तव असल्याचे तज्ज्ञ सांगतात, कारण पगारातील मोठी वाढ लोकांच्या क्रयशक्तीत वाढ करते आणि त्यामुळे महागाईवर परिणाम होऊ शकतो. यासाठी 1900, 2400, 4600, 7600 आणि 8900 ग्रेडपे स्केलसाठी 1.92 आणि 2.57 फिटमेंट फॅक्टरचा आधार घेतला जात आहे.
महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना महागाईच्या परिणामांपासून संरक्षण देण्यासाठी दिला जातो. सध्या DA 58% आहे. म्हणजेच 1 लाख बेसिक सेलरी असलेल्या कर्मचाऱ्याला 58,000 रुपये डीए मिळतो. हा दर दर सहा महिन्यांनी सुधारित केला जातो. डीएचा उद्देश पगाराचे वास्तविक मूल्य महागाईच्या तुलनेत स्थिर ठेवणे हा आहे.
8th Pay Commission | कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि सरकारचा प्लॅन काय सांगतो? :
अनेक कर्मचारी संघटना दीर्घकाळापासून महागाई भत्ता बेसिकमध्ये मर्ज करण्याची मागणी करत आहेत. जर हे केलं गेलं तर पुढील भत्ता वाढीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात अधिक वाढ होऊ शकते. मात्र अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले की असा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही.
8th Pay Commission च्या अधिसूचनेनंतर आयोगाचे कामकाज सुरू झाले आहे. आयोग आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी अंदाजे 18 महिने घेऊ शकतो. यानंतरच सरकार त्या शिफारसींवर निर्णय घेईल. त्यामुळे वेतन सुधारणा तात्काळ लागू होणार नाही. वेतनवाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे, परंतु याचा अर्थ पगार त्याच महिन्यात वाढून मिळेल असे नाही. (8th Pay Commission)
आयोगाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच मूळ वेतन, भत्ते आणि इतर आर्थिक फायदे निश्चित केले जातील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तथापि, 8th Pay Commission लागू झाल्यानंतर दीर्घकाळात कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि सुविधांमध्ये सकारात्मक बदल होणार आहे, हे निश्चित.






