DA Increase 2025 l केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी महागाई भत्त्याची (DA) वाढ यंदा अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने नुकतीच 8व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) घोषणा केली आहे, ज्याच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहेत. मात्र त्याआधीच DA वाढीच्या चर्चांनी वेग घेतला आहे. DA वाढीच्या निर्णयासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक लवकरच होणार असून त्यानंतर जानेवारी 2025 पासून नव्या DA रकमेची अंमलबजावणी केली जाईल, अशी शक्यता आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्यातील पगार वाढू शकतो तसेच दोन महिन्यांची थकबाकीही (DA Arrears) मिळण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता :
दरवर्षी होळीच्या सुमारास केंद्र सरकार DA वाढीची घोषणा करत असते. मात्र यंदा मिळालेल्या संकेतांनुसार केवळ 2% वाढ होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (AICPI) आकडेवारीनुसार यंदा DA मध्ये अत्यंत मर्यादित वाढ होणार आहे.
तसेच जुलै 2018 नंतर प्रथमच इतकी कमी वाढ करण्यात येणार आहे. यापूर्वी दरवेळी किमान 3% ते 4% वाढ केली गेली होती, तर काही वेळा ती त्याहीपेक्षा जास्त होती. त्यामुळे यंदाची 2% वाढ कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांवर विरजण घालणारी ठरू शकते.
DA Increase 2025 l AICPI निर्देशांकावर ठरते महागाई भत्त्याचे गणित
DA ठरवण्यासाठी केंद्र सरकार AICPI-IW (All India Consumer Price Index – Industrial Workers) च्या आकडेवारीचा आधार घेतं. ही आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून दरमहा प्रसिद्ध केली जाते. सरकार मागील सहा महिन्यांचा डेटा विश्लेषित करून पुढील सहा महिन्यांसाठी DA वाढीचा निर्णय घेते. मात्र या प्रक्रियेमध्ये वेळ लागत असल्याने दरवेळी DA लागू करण्यास उशीर होतो.
दरम्यान, DA वाढीचा इतिहास पाहता जुलै 2018 नंतर एवढी कमी वाढ प्रथमच होणार आहे. त्या वेळेसही केवळ 2% वाढ झाली होती. त्यामुळे यंदाची वाढ ही गेल्या सात वर्षांतली सर्वात कमी ठरणार आहे. यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी नाराज होण्याची शक्यता आहे.






