Bihar Election Result | बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा अपेक्षित नसलेला पण भव्य असा आकडा एनडीएनं गाठला आहे. तेजस्वी यादव यांच्या आक्रमक प्रचारामुळे महागठबंधनला मोठी हवा मिळाली होती, पण निकालांच्या पेटाऱ्यातून नरेंद्र मोदी (Narendra modi) आणि नीतीश कुमार (Nitish kumar) यांच्या जोडीचं करिश्माई प्रदर्शन बाहेर आलं. बिहारच्या 243 जागांपैकी तब्बल 203 जागा एनडीएच्या नावावर जमा झाल्या असून हा विजय त्सुनामीच ठरला आहे.
विशेषत: बिहारमधील महिला मतदारांनी या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावली. केंद्र आणि बिहार सरकारने राबवलेल्या योजना, थेट आर्थिक मदत आणि सुरक्षिततेबाबतचा विश्वास या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून एनडीएनं विक्रमी विजय मिळवला. तर दुसरीकडे, राजद-काँग्रेसच्या महागठबंधनाला जागा वाटपातील गोंधळ आणि कमकुवत नेतृत्व यांचा मोठा फटका बसला. (Bihar Election Result)
एनडीएच्या प्रचंड विजयामागील कारणे :
नरेंद्र मोदी (Narendra modi) आणि नीतीश कुमार (Nitish kumar) यांची डबल इंजिन सरकार ही संकल्पना मतदारांना पटली. विकासाच्या प्रकल्पांची सातत्याने दिलेली हमी, पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक आणि मजबूत कायदा-सुव्यवस्था ही एनडीएच्या मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. त्यातच जदयू-भाजपचे काटेकोर नियोजन आणि प्रत्येक मतदारसंघातील व्यवस्थापनामुळे NDA आघाडीने मतदारांपर्यंत विश्वासार्ह संदेश पोहोचवला.
महिला मतदार हा या निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा घटक ठरला. महिला खात्यांमध्ये थेट जमा झालेले 10 हजार रुपये, रोजगार योजनेचे 1.5 कोटी लाभार्थी, तसेच ‘लाडकी बहीण’ (Ladaki bahin yojana) योजनेची प्रभावी अंमलबजावणी यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान एनडीएच्या बाजूने वळवले. त्यात 125 युनिट मोफत वीज, वृद्धांसाठी पेन्शन आणि विविध डीबीटी योजनांचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.
Bihar Election Result | महागठबंधनच्या पराभवाची प्रमुख कारणे :
महागठबंधनची मोहीम सुरुवातीपासूनच विस्कळीत होती. शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटपावरून राजद आणि काँग्रेसमध्ये तणाव कायम राहिला. काँग्रेसने बिहारकडे ‘पार्टटाईम’ प्रचार म्हणून पाहिल्याचा प्रभाव थेट निकालावर उमटला. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) तुलनेने कमी सभांमुळे आणि इतर काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे तेजस्वी यादव एकटेच संपूर्ण मोहिम चालवत असल्याचे चित्र दिसले.
लालू प्रसाद यादवांच्या घरातील मतभेद, तेजप्रताप यादव (Tejpratap Yadav) यांची वेगळी भूमिका आणि स्वतःच्याच भावावर टीका यामुळे आंतरिक अस्थिरता स्पष्ट झाली. महागठबंधनने स्थानिक मुद्द्यांऐवजी मतचोरीसारख्या आरोपांवर भर दिला, परंतु बिहारच्या मतदारांनी ते स्पष्टपणे नाकारले. रोजगार, स्थलांतर आणि विकासाच्या मुद्द्यांवर ठोस रोडमॅप मांडण्यात महागठबंधन अपयशी ठरलं आणि हीच गोष्ट त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरली.
आता एनडीएच्या या प्रचंड विजयात महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गेल्या अडीच वर्षांत केलेल्या संघटनात्मक तयारीचाही मोठा वाटा असल्याचे मानले जाते. दुसरीकडे तेजस्वी यादवांनी 200 हून अधिक सभा घेऊन प्रचंड ऊर्जा दाखवली, परंतु अंतर्गत विस्कळीतपणा आणि रणनीतीचा अभाव महागठबंधनला महागात पडला.






