ZP Election Schedule | महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता राज्याचं लक्ष ग्रामीण भागातील सत्ताकेंद्रांकडे लागलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अधिकृत घोषणा केली असून महाराष्ट्रात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. (Panchayat Samiti Election)
मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) आणि सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. मतदानानंतर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर होणार आहे.
12 जिल्ह्यांत निवडणूक रणधुमाळी, अर्ज प्रक्रियेला सुरुवात :
या निवडणुकांमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 16 ते 21 जानेवारी दरम्यान मुदत देण्यात आली असून 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. (ZP Election Schedule)
27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असून त्याच दिवशी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप जाहीर केले जाणार आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून ग्रामीण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
ZP Election Schedule | आरक्षणाचा अडथळा असलेल्या जिल्ह्यांसाठी दुसरा टप्पा :
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झालेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात घेतली जाणार आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अतिरिक्त मुदत दिली असून 15 फेब्रुवारीपर्यंत या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. (Zilla Parishad Election Maharashtra)
राज्यात एकीकडे 5 फेब्रुवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असताना, दुसरीकडे ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार जोर धरताना दिसणार आहे. शहरांनंतर आता गावोगावी राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.






