MHADA Pune Lottery | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घर घेण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठी सोडत जाहीर केली आहे. विविध गृहनिर्माण योजनांमधील एकूण 4,462 सदनिकांचा या ऑनलाइन लॉटरीत समावेश आहे. विशेष म्हणजे घरांची सुरुवातीची किंमत 13 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 24 ऑगस्ट 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांना ठरलेल्या मुदतीत अर्ज करावा लागणार आहे.
अर्जासाठी मुदतीपासून सोडतीपर्यंतचे वेळापत्रक :
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या या सोडतीसाठी 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली. अर्जदारांना 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येईल. अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याची मुदतही याच वेळेपर्यंत आहे. मात्र, RTGS किंवा NEFT पद्धतीने अनामत रक्कम भरणाऱ्यांसाठी 16 सप्टेंबर 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत संधी देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रियेनंतर म्हाडाकडून 29 सप्टेंबर रोजी प्राथमिक पात्र यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीविरोधात दावे किंवा हरकती असल्यास अर्जदारांना 1 ऑक्टोबरपर्यंत त्या नोंदवता येतील. त्यानंतर छाननीची प्रक्रिया पूर्ण करून 8 ऑक्टोबर रोजी अंतिम पात्र यादी जाहीर केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर घरांसाठीची संगणकीय सोडत 13 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी कागदपत्रे आणि अर्जातील माहिती काळजीपूर्वक तपासणे आवश्यक ठरणार आहे.
MHADA Pune Lottery | पुणे-पिंपरी चिंचवडच्या अनेक भागांत घरे :
या लॉटरीमध्ये पुण्यातील विविध भागांचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मांजरी खुर्द, म्हाळुंगे आणि भूगाव येथे सदनिका उपलब्ध आहेत. तर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, मुंढवा, बावधन आणि कोंढवा खुर्द या परिसरांतील घरांचा समावेश आहे. त्यामुळे पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात घर शोधणाऱ्या नागरिकांना या सोडतीत पर्याय उपलब्ध होणार आहेत.
पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव या भागांतही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या घरांसाठीच्या किमती 13 लाख रुपयांपासून सुरू होत असल्याने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय अर्जदारांसाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.
मात्र, अर्ज करण्यापूर्वी संबंधित गटाची पात्रता, उत्पन्नाची अट, कागदपत्रे आणि योजनेतील नियम तपासणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे, तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 9 लाख रुपये आहे. उत्पन्नाचा पुरावा म्हणून 1 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीशी संबंधित दाखला सादर करावा लागणार असून, पती-पत्नीचे एकत्रित उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. म्हाडाने अर्जदारांना अधिकृत संकेतस्थळावर पात्रता आणि योजनेच्या सर्व अटी तपासल्यानंतरच अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.






