Yashwant Sardeshpande | कन्नड रंगभूमीवर आपल्या प्रभावी अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारे आणि लोकप्रिय नाटककार, दिग्दर्शक तसेच निर्माते यशवंत सरदेशपांडे यांचं सोमवारी २९ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या ६२व्या वर्षी त्यांनी बंगळुरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण कन्नड रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
यशवंत सरदेशपांडे यांचं निधन
रविवारी त्यांनी धारवाड येथे नाटक सादर केलं होतं. मात्र, सोमवारी सकाळी बंगळुरमध्ये आल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. तत्काळ त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या पश्चात पत्नी मालती सरदेशपांडे आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.
रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा अविस्मरणीय प्रवास
यशवंत सरदेशपांडे हे केवळ एक अभिनेते नव्हते तर एक यशस्वी नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती त्यांच्या प्रसिद्ध नाटक ‘ऑल द बेस्ट’ या मधून. त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर काही गंभीर कथानकांमध्ये त्यांनी प्रभावी अभिनयाने छाप पाडली.
चित्रपट निर्मिती आणि टेलिव्हिजन क्षेत्रातही त्यांनी आपलं योगदान दिलं. त्यांच्या पत्नी मालती सरदेशपांडे या देखील उत्तम अभिनेत्री आहेत आणि पतीसोबत त्यांनीही अनेक प्रकल्पांमध्ये सहभाग नोंदवला. कन्नड नाटक विश्वातील योगदानामुळे त्यांचं नाव एक आघाडीचे रंगकर्मी म्हणून घेतलं जातं.
सरदेशपांडे यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बसवाना बागेवाडी तालुक्यातील उक्कली गावात झाला. लहान असल्या पासूनच त्यांना नाटकाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी निनासम थिएटर स्कूलमध्ये औपचारिक प्रशिक्षण घेतलं. नाट्यशास्त्रात डिप्लोमा मिळवल्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठातून सिनेमा आणि नाट्यलेखनाचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला. या पार्श्वभूमीमुळे त्यांची दृष्टी अधिक समृद्ध झाली आणि त्यांनी अनेक उत्कृष्ट नाटक तसेच चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी सरदेशपांडे यांचं स्मरण करून त्यांना कन्नड रंगभूमीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी नाटककारांपैकी एक असल्याचं म्हटलं
यशवंत सरदेशपांडे यांच्या निधनानं कलेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या विनोदी अभिनयासोबतच नाटककार आणि दिग्दर्शक म्हणून केलेल्या कार्याचं स्मरण सदैव राहील.
News Title- Actor Yashwant Sardeshpande Passes Away








