Bank Scam | पंजाब नॅशनल बँकेतील एका शाखेत ग्राहकांच्या खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय कोट्यवधी रुपये काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथील या घटनेमुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या गैरव्यवहाराची व्याप्ती तब्बल 10.24 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.
बँक खात्यांमधून परस्पर 10.24 कोटी रुपये काढले :
देशातील विविध बँका आणि पतसंस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहार घडल्याच्या घटना मागील काही वर्षांत सातत्याने समोर येत आहेत. काही ठिकाणी ग्राहकांच्या खात्यांमधील रक्कम त्यांच्या माहितीशिवाय काढण्यात आली, तर काही संस्थांमध्ये बँकिंग नियमांचे उल्लंघन करून कर्जवाटप करण्यात आल्याचे प्रकार उघड झाले आहेत. अशा प्रकरणांची गंभीर दखल घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने संबंधित बँका आणि आर्थिक संस्थांवर कारवाईही केली आहे. आता पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित नव्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा बँकांमधील आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
ग्रेटर नोएडा येथील सेक्टर 1 परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत हा गैरव्यवहार झाल्याचे तपासातून पुढे आले आहे. संबंधित शाखेतील ग्राहकांच्या खात्यांमधून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रक्कम काढण्यात आली. अशा प्रकारे एकूण 10 कोटी 24 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार काही दिवसांपुरता मर्यादित नसून मागील तीन वर्षांपासून सुरू असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर संबंधित बँकेच्या ठेवीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, आपल्या खात्यातील व्यवहार तपासण्याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Bank Scam | महिला बँक कर्मचाऱ्यासह दोघांना अटक :
सीबीआयने या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासादरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये दीपांशी नावाच्या महिला कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ती ग्रेटर नोएडामधील सेक्टर 1 येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ऑफिस असिस्टंट म्हणून काम करत होती.
या प्रकरणातील दुसरा आरोपी आशुतोष पाठक असून, त्याला पुणे (Pune) येथून अटक करण्यात आली आहे. बँकेतील कर्मचाऱ्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आल्याने तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगळवारी या दोघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.






