World Air Quality Report | बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानाबरोबर प्रदुषणही खूप वाढत चालले आहे. ज्यामुळे हवेची गुणवत्ता कमी होत असून अनेक आजार जडत आहेत. अशातच एका ताज्या अहवालात सर्वात प्रदुषित शहर कोणतं आहे? याविषयी सांगण्यात आलं आहे. या अहवालानुसार, टॉप 10 मध्ये 5 भारतीय शहरांचा समावेश आहे.
आय क्यू एअर (IQAir) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२५’ (World Air Quality Report 2025) नुसार, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील लोणी (Loni) या परिसराने प्रदूषणाच्या बाबतीत जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. येथील हवेचा दर्जा इतका खालावला आहे की, पीएम २.५ (PM 2.5) कणांची सरासरी पातळी चक्क ११२.५ नोंदवण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) निश्चित केलेल्या सुरक्षित मानकांच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल २२ पट अधिक असल्याने मानवी आरोग्यासाठी ही एक धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वात जास्त प्रदूषण असलेल्या पहिल्या १० शहरांच्या यादीत निम्मी शहरे ही भारतीय असून दिल्ली (Delhi) आणि गाझियाबादमधील स्थिती अत्यंत भीषण आहे.
या भागातील प्रदूषणाची तीव्रता वाढण्यामागे तेथील दयनीय पायाभूत सुविधा हे एक प्रमुख कारण आहे. लोणीमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने जाताना धुळीचे लोट हवेत पसरतात, ज्यामुळे पीएम १० आणि पीएम २.५ च्या स्तरात मोठी वाढ होते. हिवाळ्याच्या दिवसात वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे ही प्रदूषित हवा जमिनीलगतच साचून राहते, परिणामी हवेचा थर अधिक विषारी बनतो.
केवळ नैसर्गिक कारणेच नव्हे, तर मानवनिर्मित चुकांमुळेही ही परिस्थिती ओढवली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे चालणारे प्लास्टिक पुनर्वापर (Plastic Recycling) उद्योग आणि कचरा उघड्यावर जाळण्याच्या घटनांमुळे हवेतील विषारी घटकांचे प्रमाण सतत वाढत आहे. स्थानिक रहिवाशांना या दूषित हवेमुळे दररोज आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत असून धुळीमुळे या भागाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लोणीचे आमदार नंद किशोर गुर्जर (Nand Kishor Gurjar) यांनी स्थानिक प्रशासनाला कडक निर्देश दिले असून एका विशेष समितीची स्थापना केली आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, शेजारील दिल्लीतून येणारे प्रदूषण लोणीच्या हवेचा दर्जा बिघडवत असून येथील अनधिकृत कारखाने याला प्रामुख्याने जबाबदार आहेत. जे उद्योग नियमांचे उल्लंघन करून प्रदूषण पसरवत आहेत, त्यांच्यावर येणाऱ्या काळात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिले असून उत्सर्जनावर लक्ष ठेवण्यासाठी नवीन प्रणाली राबवण्याची योजना आखली जात आहे.
दुसरीकडे, या प्रदूषित हवेचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, डोळ्यांची जळजळ आणि घशाचे विकार यांसारख्या व्याधींनी नागरिक त्रस्त झाले असून, श्वास कोंडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करावेत आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे अवैध कारखाने कायमचे बंद करावेत, अशी आर्त हाक लोणीच्या जनतेने सरकारला दिली आहे.






