Arranged Marriage | लोहगड येथील केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणानंतर अरेंज मॅरेज (Arranged Marriage) करणाऱ्या कुटुंबांमध्ये सावधगिरीचे प्रमाण वाढले आहे. भावी जावई किंवा सून यांची पार्श्वभूमी पूर्णपणे तपासून घेण्यासाठी आता अनेक पालक खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः उच्चभ्रू समाजात हा नवा ट्रेंड वेगाने वाढताना दिसत आहे.
भावी जोडीदाराची सखोल चौकशी करण्यावर भर :
लोहगड (Lohgad) किल्ल्यावर सिया गोयल (Siya Goyal) हिने तिच्या होणाऱ्या पती केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याची हत्या केल्याच्या प्रकरणानंतर तसेच देशातील इतर काही नवविवाहित जोडप्यांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटनांमुळे पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे अरेंज मॅरेज (Arranged Marriage) ठरवण्यापूर्वी केवळ पत्रिका किंवा प्राथमिक माहितीवर विश्वास न ठेवता भावी जोडीदाराची संपूर्ण पार्श्वभूमी पडताळून पाहण्याकडे कल वाढत आहे.
यासाठी अनेक कुटुंबे खासगी गुप्तहेरांची (Private Detective) नियुक्ती करत आहेत. संबंधित व्यक्तीचे चारित्र्य, व्यसनाधीनता, मित्रपरिवार, वर्तन, शैक्षणिक पात्रता, नोकरी, पगार, आर्थिक स्थिती, कर्जाची माहिती तसेच पूर्वीचे प्रेमसंबंध अशा विविध बाबींची गुप्तपणे चौकशी केली जात आहे. कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी आणि राहणीमानाची माहितीही तपासून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जात असल्याचे समोर आले आहे.
Arranged Marriage | ट्रस्ट व्हेरिफिकेशनला वाढते महत्त्व :
मानसोपचार तज्ज्ञ यांच्या मते, एखादी धक्कादायक घटना मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली की अशा घटना प्रत्यक्षापेक्षा अधिक प्रमाणात घडत असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होते. वृत्तमाध्यमे आणि सोशल मीडियावर अशा घटनांवर सातत्याने चर्चा होत असल्याने भीती वाढते. ही भीती कमी करण्यासाठी कुटुंबांकडून ‘ट्रस्ट व्हेरिफिकेशन’वर अधिक भर दिला जात आहे.
केतन अग्रवाल (Ketan Agrawal) प्रकरणानंतर अनेक पालक लाखो रुपये खर्च करून लग्नापूर्वीच भावी जोडीदाराची सविस्तर माहिती गोळा करत आहेत. काही प्रकरणांमध्ये भावी जोडीदाराचा लैंगिक कल, आर्थिक व्यवहार, कर्जबाजारीपणा आणि वैयक्तिक सवयींबाबतही माहिती मिळवण्याची मागणी खासगी गुप्तहेरांकडे केली जात आहे. गुप्तहेरांकडून मिळालेल्या अहवालाची खात्री झाल्यानंतरच लग्नाची बोलणी पुढे नेली जात आहेत. एखाद्या स्थळाबाबत गुप्तहेराने संशय व्यक्त केल्यास ते स्थळ नाकारण्याचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले आहे.






