मुंबई लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, व्हिडीओ व्हायरल

On: June 20, 2025 1:50 PM
Mumbai Local
---Advertisement---

Mumbai News | मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकल रेल्वेमधील महिला डब्यातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये किरकोळ वादाचे रूपांतर थेट जोरदार मारहाणीत झाल्याचे दिसत आहे. एकमेकींना शिवीगाळ करत, केस ओढत आणि चापटा-बुक्क्यांचा वर्षाव करत महिलांनी परस्परांवर जबरदस्त हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, यावरून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, कारण महिलांमध्ये झालेली ही तुंबळ हाणामारी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुंबई लोकलमध्ये महिलांची हाणामारी

एकमेकांचे डोके फुटेपर्यंत रक्तबंबाळ होऊन हाणामारी करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. ही घटना कोणत्या लोकलमधील आहे किंवा कधी घडली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, कल्याण रेल्वे पोलिसांकडून या व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ही घटना नेमकी कोणत्या मार्गावरील लोकलमध्ये घडली हे स्पष्ट झालेलं नसून, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे किंवा हार्बर मार्ग यापैकी कुठल्यातरी मार्गावर ही गोंधळाची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित महिलांमध्ये जागा मिळवण्यावरून वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. काही प्रवाशांनी मात्र हा वाद वैयक्तिक कारणावरून झाला असावा, असंही म्हटलं आहे, ज्यामुळे या घटनेमागील नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.

व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल. महिला डब्यात गर्दी ही नित्याची बाब आहे. सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या महिलांमुळे लोकल ट्रेनमध्ये जागेवरून किंवा गर्दीतील ढकला-ढकलीवरून अनेकदा वाद निर्माण होतात. पण या वादांना इतक्या टोकाला नेणं आणि थेट मारामारी करणे हे नक्कीच चिंताजनक आहे. यामुळे इतर प्रवासी महिलांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं.

रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. तसेच, महिला डब्यात सुरक्षा वाढवण्याची गरजही असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे.

News Title-  Women’s Fierce Fight in Local Train

 

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now