CJP निवडणुका लढवणार? अभिजीत दीपकेंनी भूमिका स्पष्ट केली

On: August 3, 2026 12:44 PM
Abhijeet Dipke
---Advertisement---

Abhijeet Dipke | देशभरात चर्चेत असलेली कॉकरोच जनता पार्टी आगामी काळात राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढवणार का, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाच्या भविष्यातील दिशेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. तसेच छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पक्षाच्या पुढील रणनीतीवर महत्त्वाची बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

सामाजिक चळवळ कायम ठेवण्याचा निर्णय :

कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाल्यापासून अल्पावधीतच या संघटनेने देशभरात मोठे लक्ष वेधले आहे. सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीमधून या चळवळीची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला केवळ इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेली ही संघटना नंतर प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत आली. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर या संघटनेची देशभरात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यामुळे ही संघटना पुढे राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता.

आज अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीपूर्वी पत्रकारांनी निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, प्रसारमाध्यमांनाच कॉकरोच जनता पार्टीने राजकीय पक्ष व्हावे अशी अधिक उत्सुकता दिसत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत आणखी एक राजकीय पक्ष निर्माण करण्याची गरज वाटत नसून ही संघटना सामाजिक चळवळ म्हणूनच पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Abhijeet Dipke | राजकारणावरील नाराजी व्यक्त :

अभिजीत दीपके यांनी देशातील विद्यमान राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. देशात आधीच अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत, मात्र सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत चालल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आणखी एक पक्ष स्थापन करून परिस्थितीत कोणताही मूलभूत बदल होणार नाही, असे त्यांचे मत आहे. समाजातील प्रश्नांवर जनजागृती आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हेच संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पक्षांतराच्या राजकारणावरही टीका केली. नागरिक सकाळी एका उमेदवाराला मतदान करतात, परंतु नंतर सरकार वेगळ्याच पक्षाचे तयार होते किंवा निवडून आलेले आमदार-खासदार पक्ष बदलतात, त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक चळवळ अधिक व्यापक करण्यावर भर दिला.

News Title: Abhijeet Dipke Clarifies CJP Election Stand

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now