Pakistan | मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आता जागतिक स्तरावर चिंता वाढवली आहे. इराण (Iran) आणि इस्रायल (Israel) यांच्यातील युद्ध अधिक तीव्र होत असताना, त्याचे पडसाद इतर देशांपर्यंत पोहोचू लागले आहेत. इराणकडून सौदी अरेबिया (Saudi Arabia) मधील काही भागांवर हल्ले झाल्याच्या वृत्तानंतर आता पाकिस्तान (Pakistan) या संघर्षात थेट सहभागी होणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः संरक्षण कराराच्या पार्श्वभूमीवर ही शक्यता अधिक महत्त्वाची ठरत आहे.
मध्य-पूर्वातील युद्धामुळे जगभर अस्वस्थता :
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायल आणि अमेरिका (United States) यांच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली आहे. त्यानंतर इराणकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून, ज्या देशांमध्ये अमेरिकन लष्करी तळ आहेत त्या ठिकाणी हल्ले केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. याच मालिकेत इराणने सौदी अरेबियातील काही भागांनाही लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे.
या घडामोडींमुळे मध्य-पूर्व आशियातील जवळपास सर्वच देश तणावाच्या छायेत आले आहेत. युद्धाचा व्याप वाढत चालल्याने इतर राष्ट्रेही यात ओढली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानची भूमिका निर्णायक ठरू शकते. सौदी अरेबियावर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीसाठी थेट पावले उचलणार का, याकडे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांचे संबंध केवळ राजनैतिक नाहीत, तर लष्करी पातळीवरही अतिशय जवळचे मानले जातात.
Pakistan | पाकिस्तान-सौदी संरक्षण करार आणि संभाव्य युद्ध :
सप्टेंबर 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि अण्वस्त्रधारी पाकिस्तान यांच्यात “स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स करार” झाला होता. या करारानुसार, दोन्ही देशांनी स्पष्ट केले होते की कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला हा दोघांवर झालेला हल्ला मानला जाईल. या करारामुळे भविष्यात पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी फायदा होऊ शकतो, असे तेव्हा सांगितले जात होते. मात्र आता सौदी अरेबियावर थेट हल्ले झाल्यामुळे हा करार प्रत्यक्षात लागू होणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
जर या कराराच्या अटींचे पालन केले गेले, तर पाकिस्तानला सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी युद्धात उतरावे लागू शकते. तथापि, परिस्थिती इतकी सोपी नाही. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यातही तणाव सुरू असून, दोन्ही देशांमध्ये सीमावाद आणि हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. अशा वेळी पाकिस्तान एकाच वेळी दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका पत्करेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सौदी अरेबियाचे प्रमुख शत्रू म्हणून इराण आणि इस्रायल यांची ओळख आहे. सौदी अरेबिया आपल्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून आहे. ग्लोबल फायरपॉवर डेटाबेसनुसार जगातील सर्वात शक्तिशाली 145 देशांमध्ये सौदी अरेबियाचा क्रमांक 24 वा, तर पाकिस्तानचा 12 वा आहे. त्यामुळे हे दोन्ही देश एकत्र आल्यास लष्करी ताकद लक्षणीयरीत्या वाढू शकते. अशा परिस्थितीत पाकिस्तान कोणता निर्णय घेतो, यावर या युद्धाची पुढील दिशा ठरणार आहे.






