Rajpal Yadav | रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा बॉलिवूडचा ‘कॉमेडी किंग’ राजपाल यादव आज मात्र गंभीर संकटात सापडला आहे. 15 वर्षांपूर्वी केलेल्या एका चुकीमुळे त्याला थेट तिहार जेलची हवा खावी लागली आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी त्याने स्वतःहून शरणागती पत्करली असून त्याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही बातमी चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे.
“माझ्याकडे पैसे नाहीत, कोणीही सोबत नाही” :
2010 मध्ये स्वतः दिग्दर्शित केलेल्या ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी राजपाल यादवने दिल्लीतील ‘मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’कडून 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आणि राजपाल आर्थिक अडचणीत सापडला. कर्ज फेडण्यासाठी दिलेले सात चेक बाऊन्स झाले आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. 2018 मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव (Rajpal Yadav) आणि त्याची पत्नी राधा यादव यांना दोषी ठरवले. व्याजासह ही रक्कम जवळपास 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.
जेलमध्ये जाण्यापूर्वी राजपाल यादवने दिलेली प्रतिक्रिया अत्यंत भावूक होती. “सर, माझ्याकडे आता पैसे नाहीत आणि मदतीसाठी कोणीही नाही. इथे आपण सगळे एकटेच असतो,” असे म्हणत तो ढसाढसा रडताना दिसला. त्याने फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांकडे मदत मागितली, मात्र कोणाकडूनही ठोस सहकार्य मिळाले नाही, असेही समोर आले.
Rajpal Yadav | कोर्टाचा कठोर पवित्रा :
राजपाल यादवने (Rajpal Yadav) कोर्टाकडे वारंवार मुदतवाढ मागितली होती. ऑक्टोबर 2025 पर्यंत त्याने 75 लाख रुपये भरले होते, मात्र एकूण 9 कोटींच्या तुलनेत ही रक्कम फारच कमी होती. अखेर 4 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयाने त्याची अंतिम याचिका फेटाळली.
“सेलिब्रिटी स्टेटस असल्याने नेहमीच सवलत देता येणार नाही,” असा कठोर इशारा देत कोर्टाने सहा महिन्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी केली आणि 5 फेब्रुवारी रोजी राजपाल यादव तिहार जेलमध्ये दाखल झाला.






