Nirmala Nawale | पुणे जिल्ह्यातील कारेगाव – कान्हूर मेसाई पंचायत समिती गणात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत माजी सरपंच निर्मला नवले यांना भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी ३२९ मतांनी पराभूत केले. या निकालानंतर निर्मला नवले यांनी सोशल मीडियावरून पहिली प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पराभवाने धक्का बसला असला तरी आपल्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रेम, विश्वास आणि निष्ठेला त्यांनी मोठं मानलं आहे. निवडणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांत सहकाऱ्यांनी घेतलेले कष्ट आणि मेहनत याबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले आहेत.
“हा पराभव वेदनादायक, पण तुमचं प्रेम मोठा विजय” :
निर्मला नवले यांनी इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटलं की, “हा ३२९ मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आणि वेदनादायक आहे, हे मी मान्य करते. पण या पराभवापेक्षा तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा माझ्यासाठी खूप मोठा विजय आहे.” पुढील काळात नव्या जिद्दीने पुन्हा उभं राहून संघर्ष सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे प्रेम करणाऱ्या आणि प्रत्येक टप्प्यावर माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सहकाऱ्यांचे मी सदैव ऋणी राहीन, असंही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं आहे.
Nirmala Nawale | कोण आहेत निर्मला नवले? :
इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या निर्मला शुभम नवले (Nirmala nawale) यांनी पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंचपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असून, एनसीपी युवती महाराष्ट्रच्या वर्किंग प्रेसिडेंट पदावर असल्याचा उल्लेख त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर आहे.
सोशल मीडियावरही त्या प्रचंड लोकप्रिय असून, इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि रील्स व्हायरल झाले असून, तरुणांमध्ये त्यांची मोठी ओळख निर्माण झाली आहे.






