Devendra Fadnavis | दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि थेट भूमिका मांडली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, “हा विषय त्यांच्या पक्षाचा आहे. जेव्हा अधिकृत निर्णय होईल तेव्हा ते सांगतील. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे,” असे म्हणत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
जलसंपदा प्रकल्पांना मोठी चालना :
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील महत्त्वाच्या विकास निर्णयांचीही माहिती दिली. पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने प्रस्तावित विमानतळासाठी भूमी अधिग्रहणाला मान्यता देण्यात आली असून, सुमारे ९६ टक्के शेतकऱ्यांची संमती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. १ जूनपर्यंत जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागासाठी ४० प्रकल्प आणि १०० कालव्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून १५ हजार कोटी रुपयांच्या दीर्घ मुदतीच्या कर्जाला मंजुरी देण्यात आल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. या प्रकल्पांमुळे साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून, राज्यातील आठ लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
Devendra Fadnavis | संघावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर झालेल्या टीकेवरही मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्यांना निमंत्रण मिळालं नाही म्हणून त्यांना वाईट वाटतंय. त्यामुळे ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर टीका केली जात आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांना आमंत्रित करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






