Ajit Pawar Plane Crash | अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अपघाताबाबत अनेक नेत्यांनी संशय व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आलं. अशातच अजितदादांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं याची मिनिटागणिक माहिती दिली.
रोहित पवार यांनी सांगितलं की, अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. सुमारे 210 किलोमीटरचा हा प्रवास साधारण 27 मिनिटांत पूर्ण होणार होता. व्हिएसआर कंपनीचं लेअरजेट विमान असून ते अमेरिकेत तयार झालेलं होतं. विमानात अजित पवार डाव्या बाजूला बसले असावेत, तर मागील भागात सामान आणि इंधनाच्या टाक्या होत्या, अशी माहिती त्यांनी दिली.
उड्डाणापासून अपघातापर्यंतचा संपूर्ण प्रवास :
रोहित पवार म्हणाले की, सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी विमान क्रू विमानतळावर पोहोचला होता. 7.10 वाजता बारामती विमानतळाकडून हवामान आणि दृश्यता योग्य असल्याचा संदेश मिळाला. अजित पवार 7.30 वाजता विमानतळावर आले आणि काही वेळातच विमानाने उड्डाण केलं. 8.22 वाजता विमान लोणावळ्याजवळ होतं, 8.25 ला पुण्याच्या परिसरात, 8.30 ला यवत, तर 8.32 वाजता सुपेजवळ पोहोचलं. त्यानंतर 8.43 ते 8.45 दरम्यान अपघात झाल्याची शक्यता आहे. (Ajit Pawar Plane Crash)
सकाळी 9 वाजता अजित पवार जखमी असल्याची माहिती समोर आली, मात्र 9.45 वाजता त्यांच्या निधनाची बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासह राज्यभरात शोककळा पसरली, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
Ajit Pawar Plane Crash | 16 वर्ष जुनं विमान, मेंटेनन्सवर संशय :
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, संबंधित विमान हे सुमारे 16 वर्ष जुनं होतं. अपघाताच्या दोन दिवस आधी हे विमान सुरतला जाऊन आलं होतं. कंपनीच्या मालकांनी विमान चांगल्या स्थितीत होतं, योग्य मेंटेनन्स केलं जात होतं आणि वैमानिक अनुभवी असल्याचं सांगितलं आहे. मात्र गावकऱ्यांनी विमानाचा आवाज वेगळा असल्याचं सांगितल्याने मेंटेनन्समध्ये काहीतरी बिघाड असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. (Ajit Pawar Plane Crash)
तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान तिरकस होत खाली येताना दिसत असल्याचंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा अपघात हवामानातील दृश्यता कमी असल्यामुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे, याबाबत तपासातूनच सत्य समोर येईल, असंही त्यांनी सांगितलं.






