Farmer Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, सहकार विभाग आणि जिल्हा बँका पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. कर्जनिवारण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित झालेल्या थकीत कर्ज खात्यांची सविस्तर माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही बँक शाखा आणि संबंधित कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती.
प्रशासनाने दोन दिवसांत सर्व माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सध्या १ लाख ३२ हजार ११९ थकीत शेतकरी सभासद असून, त्यांच्यावर ७७५ कोटी रुपयांचे मुद्दल कर्ज आणि त्यावर ६४० कोटी रुपयांचे व्याज जमा झाले आहे. ही आकडेवारी पाहता जिल्ह्यातील थकीत कर्जाचा भार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट होत आहे. (Farmer Loan Waiver)
आधार कार्ड आणि फार्मर आयडी अनिवार्य :
प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहेत की, आगामी काळात शासनाकडून कर्जमाफी जाहीर झाल्यास आधार कार्ड आणि फार्मर आयडी अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सध्या माहिती संकलनावर भर देण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास अद्याप उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही ठिकाणी माहितीअभावी, तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे आधार व फार्मर आयडी नोंदणी प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे सेवा सहकारी संस्थांवर अतिरिक्त ताण वाढला असून, वारंवार सूचना देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत संस्था प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
Farmer Loan Waiver | वेळेत माहिती न दिल्यास लाभापासून वंचित राहण्याची शक्यता :
प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, वेळेत माहिती संकलित झाली नाही, तर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तत्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Farmer Loan Waiver News)
याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, “ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्याप आधार कार्ड, फार्मर आयडी व इतर आवश्यक माहिती सहकारी संस्था किंवा बँक शाखेला दिलेली नाही, त्यांनी तातडीने ही माहिती द्यावी. प्रशासन, सहकारी संस्था आणि बँकांच्या समन्वयातूनच शेतकऱ्यांना कर्जनिवारण योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.”






