“आमच्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत?”, अली कुटुंबीयांचा हृदयद्रावक सवाल

On: June 14, 2025 12:32 PM
Plane Crash
---Advertisement---

Plane Crash | गुजरातमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला असताना, या दुर्घटनेत मुंबईतील गोरेगावचे रहिवासी जावेद अली, त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलांचे हृदयद्रावक निधन झालं. मात्र, घटनेनंतर दोन दिवस उलटल्यानंतरही अली कुटुंबीयांना आपल्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या व्यथेला आता संतापाचे रूप आले आहे.

दोन दिवस झाले… पण उत्तर मिळालं नाही :

जावेद अली यांच्या मामीने माध्यमांशी बोलताना संतप्त भावनेत विचारलं, “आमच्या दोन आणि चार वर्षांच्या मुलांचे मृतदेह कुठे आहेत? आम्ही दोन दिवसांपासून रुग्णालयात चकरा मारतोय. रुग्णालय प्रशासन सांगतंय की मुलं लहान असल्यामुळे अवशेष मिळणं कठीण आहे. पण काहीतरी तरी द्या, ओळख पटावी, आम्हाला समाधान मिळावं.” (ahmedabad Plane Crash)

ही भावना संपूर्ण देशातील नागरिकांना हेलावून टाकणारी आहे. लहान बालकांचे अवशेषही सापडत नसल्याने अली कुटुंबीयांची तगमग अधिक वाढली आहे.

Plane Crash | कसोटी भवन येथे डीएनए चाचण्या सुरू :

अहमदाबादच्या कसोटी भवन या ठिकाणी अपघातग्रस्तांचे अवशेष गोळा करून डीएनए चाचणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, 40 तास उलटून गेल्यानंतरही मृतदेहांबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नातेवाईकांमध्ये नाराजी आहे. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवाशांचे मृतदेह ओळखण्याजोगे राहिले नाहीत. (ahmedabad Plane Crash)

जावेद अली हे मागील १२ वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या आईच्या प्रकृतीच्या कारणामुळे, संपूर्ण कुटुंब फक्त ७ दिवसांसाठी मुंबईत आले होते. १२ जूनला लंडनला परतत असतानाच त्यांचं संपूर्ण कुटुंब अपघातात उद्ध्वस्त झालं. तसेच हा फक्त एका कुटुंबाचा शोक नाही, तर संपूर्ण समाजाच्या हृदयाचा ठाव घेणारी वेदना आहे.

महाराष्ट्रातील १६ जणांचा मृत्यू :

या विमान अपघातात एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील १६ प्रवासी होते. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल, तसेच दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक यांच्यासारख्या अनेक जणांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारने आणि विमान कंपनीने अधिक पारदर्शक आणि जलद कारवाई करणे गरजेचे ठरणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना अधिक काळ अनिश्चिततेत ठेवणं ही केवळ व्यवस्थेची हार नव्हे, तर माणुसकीच्या परीक्षेतील अपयश ठरेल.

News Title: Where Are Our Children’s Bodies?, Family Cries for Answers After Gujarat Air India Plane Crash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now