ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

On: August 2, 2025 11:43 AM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आता ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली असून, या महिन्यात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, भारतीय हवामान खात्याने ऑगस्ट महिन्यातील पावसाबद्दल एक मोठा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने पिके चांगली वाढली आहेत, परंतु ऑगस्टमध्ये नेमका कसा पाऊस होतो, यावर शेतपिकांचे भविष्य ठरेल. (Maharashtra Weather Update)

काही भागांमध्ये पावसाचा इशारा :

काल भारतीय हवामान विभागाने काही भागांमध्ये पावसाचा इशारा दिला होता. आजही विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा काही भागांमध्ये देण्यात आला आहे. फक्त विदर्भच नाही, तर कोकणातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावू शकतो. पुणे, मुंबई, सांगली, सातारा या भागांतही पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाकडून आज विदर्भात ‘यलो अलर्ट’ (Rain Yellow alert) जारी करण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशिम या भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातील धरण क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस होताना दिसतोय, ज्यामुळे धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे.

Weather Update | प्रशासनाकडून नुकसानीची आकडेवारी जाहीर :

यंदाच्या वर्षी मान्सूनने अपेक्षेपेक्षा आधीच देशात आणि राज्यात प्रवेश करत दमदार सुरुवात केली होती. जून महिन्याच्या मध्यावर काहीसा खंड पडल्यानंतर जुलैमध्ये पावसाने पुन्हा जोर धरला. मात्र, जुलैच्या अखेरीस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. पण आता ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. (Maharashtra August  Weather Update)

गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जनावरेही दगावली आहेत. दोन वेळा निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत ७२० घरांचे व २५० जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या चार धरणांमध्ये पाणी साठा समाधानकारक आहे. इटियाडो धरणात ९८%, शिरपूर धरणात ७०%, कालीसराळमध्ये ६८% आणि पुजारी टोला धरणात ६७% पाणीसाठा आहे.

मुंबई शहरात समाधानकारक पाऊस झाला :

यंदाच्या जुलै महिन्यात मुंबई (Mumbai Rain Update) शहरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. १ ते ३१ जुलैदरम्यान कुलाबा केंद्रात ३७८.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ७९०.६ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षीच्या तुलनेत या महिन्यातील पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली आहे. जुलै २०२४ मध्ये कुलाबा केंद्रात १४०१.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १७०२.८ मिमी पाऊस नोंदला गेला होता.

यंदा मोसमी पाऊस मुंबईत लवकर दाखल झाला, मात्र पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. जुलैच्या सुरुवातीचे १५ दिवस पाऊस पडला नाही, अधूनमधून हलक्या सरी बरसल्या, मात्र मुसळधार पाऊस या कालावधीत पडला नाही. साधारण २० जुलैनंतर मुंबईत पाऊस सक्रिय झाला. या कालावधीत मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे सांताक्रूझ येथील आकडेवारीत वाढ झाली. खडकवासला धरण क्षेत्रात ८७.९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच वेळी धरणात ९०.७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

News Title: What Will Be the Rainfall in August? Indian Meteorological Department’s Major Forecast; Thunderstorms in Vidarbha

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now