Pranjal Khewalkar | एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केल्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह गोष्टींची माहिती दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विशेष तपास पथक या प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता आहे.
रूपाली चाकणकर धक्कादायक खुलासा
पुणे खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात महिला आयोगाने पोलिसांकडून अहवाल मागवला होता. हा अहवाल आयोगाला देण्यात आला असून, त्यामध्ये अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये घरातील साफसफाई करणाऱ्या महिलेचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. याशिवाय, अनेक मुलींचे फोटोही मोबाईलमध्ये मिळाले आहेत. पुणे पोलिसांनी ज्या रेव्ह पार्टीवर छापेमारी केली, त्या पार्टीतूनही काही मुलींना ताब्यात घेण्यात आले होते. घरातील महिला कामगाराचे व्हिडिओ सापडल्याने त्या दोघांचा नेमका काय संबंध होता, याचा तपास आता केला जाणार आहे.
खेवलकरांकडून मुलींना ब्लॅकमेल
यासोबतच, मोबाईलमध्ये महिलांवरील काही अत्याचाराचे व्हिडिओही सापडले आहेत. रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ फोटो मिळाले आहेत. यापैकी काही फोटो मुलींचे असून ते अश्लील आहेत. या व्हिडिओमधून हे स्पष्ट होतंय की, मुलींना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे दिसत आहे. या व्हिडिओचा वापर मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात आला असल्याचाही आरोप चाकणकर यांनी केला आहे. तसेच, पार्टीत परप्रांतीय मुलींना बोलावले जात असल्याचाही खुलासा झाला आहे.
रूपाली चाकणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता यावर एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि प्रांजल खेवलकरच्या पत्नी रोहिणी खडसे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या पतीच्या बचावासाठी रोहिणी खडसे गेल्या काही दिवसांपासून मैदानात उतरल्याचे दिसत आहे. या नव्या खुलाशांमुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
News Title- What Was Found in Khadse’s Son-in-Law’s Mobile? Videos of Housemaid, Special Investigation Team to Probe?






